Chakan : व्यावसायिकाचे अपहरण करून एक कोटींची खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाचे (Chakan) अपहरण करून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास व्यावसायिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी चाकण पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे (रा. अहमदनगर कॉलनी, नाणेकरवाडी, ता. खेड), आकाश विनायक भुरे (वय 24, रा. नाणेकरवाडी ता. खेड), शुभम युवराज सरवदे (वय 21, रा. नाणेकरवाडी ता खेड), अजय नंदु होले (वय 28, रा. हडपसर गाडीतळ पुणे), नवनाथ शांताराम बच्छे (वय 27, रा. शिक्रापुर रोड, कडाचीवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

ही घटना 21 ते 23 सप्टेंबर या कालावधीत खेड तालुक्यातील शिरोली येथे घडली होती. व्यावसायिक संजय धुलाप्पा कुरुंदवाडे (वय 55, रा. चाकण) यांच्या फिर्यादी वरून आकाश विनायक भुरे (वय 22, रा. नाणेकरवाडी, ता. खेड), शुभम सरोदे, अजय येलोटे, सोहेल पठाण, पन्या गोसावी (पूर्ण नावे माहिती नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Pune : मोठी बातमी! ससून रुग्णालयात उपचाराच्या बहाण्याने दाखल होत चालवत होता ड्रग्ज रॅकेट; पोलिसांनी उधळला डाव

फिर्यादी संजय हे 21 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास आळंदी फाटा येथून एकतानगर चाकण येथे घरी जात (Chakan) होते. त्यावेळी आरोपी रिक्षातून आले. त्यांनी फिर्यादी यांच्या गाडीला रिक्षा आडवी लावून संजय यांना अडवले. त्यांच्या गाडीची चावी आणि मोबाईल फोन घेऊन त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून शिरोली येथील एका शेतात नेले. रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजताच्या कालावधीत त्यांना शेतात डांबून ठेवले.

‘तुझा मोठा व्यवसाय आहे. तुला आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील. तरच तुला सोडू नाहीतर तुझी व तुझ्या घरच्यांची गेम करू. उडवून टाकू’ असे म्हणत संजय यांच्या पायावर शस्त्र ठेऊन त्यांना धमकी दिली. त्यानंतर संजय यांच्या बॅग मधून जबरदस्तीने 20 हजार रुपये काढून घेतले. ‘दोन दिवसात कमीत कमी 12 लाख रुपये दिले नाही तर तुला व तुझ्या घरच्यांना संपवून टाकू’ अशी धमकी देऊन संजय यांना सारा सिटी येथे दुचाकीवरून आणून सोडले. त्यानंतर वारंवार फोन करून पैशांची मागणी केली.

एटीएम सेंटर मधील कचऱ्याच्या डब्यात पैसे

आरोपींनी संजय यांच्याकडे केलेल्या पैशांची मागणी प्रमाणे संजय यांनी पैसे देण्यास होकार दिला. त्यानंतर आरोपींनी प्रत्यक्ष भेटून पैसे घेण्याऐवजी नाणेकरवाडी येथील हिताची कंपनीच्या एटीएम सेंटर मधील कचऱ्याच्या डब्यात पैसे टाकण्यात सांगितले. हा प्रकार संजय यांनी पोलिसांना सांगितला.

त्यानुसार पोलिसांनी एटीएम सेंटरवर पाळत ठेवली. एटीएम सेंटर मधील कचऱ्याच्या डब्यातून पैसे घेण्यासाठी आरोपी आकाश भुरे आला असता पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याच्या चार साथीदारांना चऱ्होली, शिक्रापूर, हडपसर, कात्रज या भागातून अटक केली. अटक केलेल्या सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर चाकण, हडपसर, भोसरी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.