Chakan : बड्या महापालिकांचा कचराही चाकणला ?

नागरिकांतून संताप; सर्वपक्षीयांची पाहणी  

एमपीसी न्यूज – चाकण परिसरात दररोज शेकडो मेट्रिक टन कचरा तयार होत असून हा कचरा सध्या आंबेठाण (Chakan) रस्त्यावरील खराबवाडी ( ता. खेड ) हद्दीतील  खाणीत टाकण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणाने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीरस्वरूप धारण करीत असताना याच ठिकाणी लगतच्या खेड तालुक्याच्या लगतच्या काही बड्या महापालिकांच्या हद्दीतील कचरा देखील बेकायदेशीरपणे आणून टाकला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या ठिकाणी खेड तालुक्याच्या बाहेरील भागातून रात्रीच्या वेळी मोठे डंपर भरून अत्यंत धोकादायक आणि वैद्यकीय कचरा आणून टाकला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. बिरदवडी भागातील कार्यकर्त्यांनी यातील काही वाहने पकडून थेट पोलिसांना कळवले.

Maharashtra News : राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर प्रो-गोविंदा स्पर्धा; पहिले बक्षीस 11 लाख रुपये

मात्र हा प्रश्न आमच्या कक्षेत नसल्याचे सांगत महाळुंगे पोलिसांनी कानावर हात ठेवले. त्यामुळे रात्रीच्या वेळी या भागात कचरा आणून टाकणाऱ्या काही मंडळींचे चांगलेच फावले आहे.संतप्त झालेल्या चाकण आणि परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कचरा डेपोची पाहणी केली. बाहेरून कचरा आणून या भागात टाकणाऱ्या मंडळींवर कारवाई करण्याची मागणी भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड येथील काही ठेकेदार रात्रीच्या वेळी या भागात मोठ्या प्रमाणावर कचरा आणून जाळत असल्याचे आरोप भाजपचे कालिदास वाडेकर, चाकण विकास मंचचे कुमार गोरे, कॉंग्रेसचे निलेश कड, बिरदवडीचे सरपंच दत्तात्रेय गोतारणे व ग्रामस्थांनी केला आहे.दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत स्थानिक स्वराज्य संस्थाची बैठक घेऊन याकडे लक्ष वेधल्याचे मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी सांगितले आहे.

त्यामुळे वाढला प्रदूषणाचा धोका 
गेल्या बारा-पंधरा वर्षात चाकण व औद्योगिक परिसरातील कचऱ्याचे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे.  चाकण -आंबेठाण रस्त्यावर खराबवाडी (ता.खेड)  हद्दीतील दगड खाणीत गेल्या अनेक वर्षांपासून चाकण नगरपरिषदेसह लगतच्या भागातूनही येथे कचरा टाकण्यात येत आहे. आजपर्यंत घनकचरा प्रकल्पच सुरू होऊ न शकल्यामुळे लाखो टन कचरा या अघोषित डम्पींग यार्डवर पडून रहातो . काही दिवसांनतर कसलीही प्रक्रिया न करता हा कचरा पेटवून दिला जातो.  या कचऱ्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढला असल्याचे बिरदवडी ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.

20 वर्ष अशीच स्थिती 

चाकण मधील कचरा समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी चाकण नगरपरिषदेने मागील काही वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. घनकचरा प्रकल्पासाठी जागा प्रशासनाकडून पदरात पाडून घेण्यासाठी नगरपरिषद धडपड करीत आहे. मात्र अद्याप या बाबत ठोस निर्णय झालेला नाही. सध्या खराबवाडी येथील खाणीत कचरा कुठल्याही प्रक्रियेविना एकाच ठिकाणी फेकला जातो. नंतर त्याला आग लावून दिली जात असल्याची स्थिती (Chakan)  मागील १५ ते २० वर्षात पहावयास मिळत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.