Chakan : इंद्रायणीकाठी आढळले नवजात स्त्री जातीचे अर्भक

कुरुळी हद्दीतील पुलाजवळील प्रकार

एमपीसी न्यूज- पुणे – नाशिक महामार्गावरील कुरुळी ( ता. खेड ) गावच्या हद्दीतील इंदायणी पुलाजवळ दोन ते तीन दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे नवजात बेवारस अर्भक मंगळवारी ( दि. 18 ) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान प्लास्टिक पिशवीत गुंडाळून कापडात आणून ठेवल्याचे आढळले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून संबंधित ठिकाणाहून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नवजात अर्भकाची प्रकृती व्यवस्थित आहे.

कुतुब अलीसाफ शेख ( वय – 35 वर्षे, रा. सदगुरुनगर, भोसरी, पुणे) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबतचे वृत्त असे की, शेख हे आयआरबी कंपनीचे सुपरवायझर म्हणून काम पाहतात. मंगळवारी ( दि. 18 ) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान त्यांना त्यांचे कामगार शिवाजी किसन कड ( रा. संतोषनगर, भाम, वाकी, ता. खेड ) यांनी वरील घटनेची माहिती दिली. शेख यांनी तातडीने घटनास्थळावर जाऊन खात्री केली असता दोन ते चार दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक प्लास्टिक पिशवीत गुंडाळून कापडी फडक्यात आणून ठेवलेले दिसले. त्यांनी त्वरित याबाबत चाकण पोलिसांना कळविले.

चाकण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. संबंधित बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती व्यवस्थित असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, हे नवजात बाळ याठिकाणी कोणी आणून ठेवले. या भागातील दवाखान्यामध्ये कोणी महिला बाळंतपणासाठी आली होती का, याचा चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.