Chakan : संवाद यात्रेस तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टिकाऊ आरक्षणाची युवकांची मागणी

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विविध प्रकारे आंदोलने, मोर्चे , संवाद यात्रा चाकणकरांनी अनुभवल्या आहेत. चाकण मध्ये सर्वात हिंस्त्र आंदोलनाचा भडका उडाल्याचे राज्याने पहिले. चाकण मधील मराठा आरक्षण मुद्द्यावर युवकांचा सहभाग नेहमीच मोठ्या प्रमाणावर दिसून आला. त्याचाच प्रत्यय मराठा क्रांती मोर्चा , पुणे जिल्हा आयोजित मराठा संवाद यात्रेत युवकांच्या उदंड प्रतिसादातून दिसून आला. यावेळी युवकांनी शासनाच्या धोरणाबाबत संशय व्यक्त करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

राज्य सरकारने मराठा आरक्षणाची अधिकृत घोषणा आणि इतर विविध प्रकारच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्याने मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी आणि मराठा आरक्षणासाठी निकराचा लढा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे संवाद यात्रा गावागावातून फिरू लागल्या आहेत . स्वतंत्र आरक्षण न देता ओबीसी मधून आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. या यात्रेला चाकण परिसरातील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. संवाद यात्रेच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणीसाठी वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

स्वतंत्रपणे देण्यात आलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकत नसल्याचा सूर अनेक युवकांकडून आळवला जात आहे. मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्यात यावे अशी मागणी युवकांकडून करण्यात येत आहे. मराठा मुलांसाठीच्या वसतिगृहांचा प्रलंबित प्रश्‍न, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, ईबीसी सवलतीमधील सावळागोंधळ, मराठा आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलली नसल्याबाबत युवकांत असलेला रोष या निमित्ताने पहावयास मिळत आहे.

दिशाभूल होऊ नये : अतिश मांजरे
मराठा समाजाला आरक्षण देण्याची तयारी राज्य सरकार दाखवीत असले तरी हे आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे. यासाठी तद्न्य मंडळींच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेणे गरजेचे आहे. मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवून देण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे . त्यामुळे समाजाची दिशाभूल करण्याचे पातक शासनाने न करता यासाठीचे खरेखुरे प्रयत्न केले पाहिजेत.

राज्यकर्त्यांकडून आरक्षणाचे गाजर : अनिल सोनवणे
राज्यकर्ते मराठ्यांना अरक्षणाच गाजर दाखवत आहेत. त्यामुळे युवकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. केवळ समाजाचा रोष कमी व्हावा यासाठी वेगवेगळी विधाने करून २६ नोव्हेंबर चे आंदोलन शांततेत व्हावे यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. स्वतंत्रपणे देण्यात आलेले आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकत नसताना शासनाकडून तीच भूमिका पुढे करण्यात येत आहे. स्थायी स्वरूपाचे आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

तर राज्यकर्ते हात झटकतील : निलेश कड
राज्यकर्त्यांनी केवळ शब्द फिरवून आरक्षणाचे गाजर पुढे केले आहे. मागील चार वर्षे भाजप शासनाने केवळ मराठा समाजाला खेळवत ठेवले आहे. आधीच्या शासनाने ज्या पद्धतीने आरक्षण देऊ केले होते त्यावर न्यायालयात भूमिका मांडण्यात सध्याचे राज्यकर्ते अपयशी ठरले. त्यामुळे या राजकर्त्यांवर मराठा समाजातील युवकांचा विश्वास राहिलेला नाही. भविष्यात न्यायालयात यास स्थगिती मिळाल्यास राज्यकर्ते हात झटकून मोकळे होण्याची भीती मराठा युवकांत आहे.

राज्यकर्त्यांची भूमिका संदिग्ध: निलेश पानसरे
राज्यभरात होत असलेल्या संवाद यात्रांमधून युवकांमध्ये जनजागृती होत आहे. आरक्षणाबाबत ठोस भूमिका राज्यकर्ते मांडत नसल्याने २६ नोव्हेंबरला मुंबईत विधान भवनावर या भागातील युवक हजारोंच्या संखेने जाणार आहेत. टिकाऊ स्वरूपाचे आरक्षण मिळेपर्यंत हा लढा असाच सुरु राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.