Nagpur : संभाजी भिडे यांच्या ‘मनू संताहून श्रेष्ठ’ विधानावर मुख्यमंत्र्याचे कारवाईचे संकेत

एमपीसी न्यूज – वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुण्यात आलेल्या संभाजी भिडे यांनी जंगली महाराज मंदिरात आपल्या अनुयायांसमोर बोलताना "मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता" असे धक्कादायक विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर वादही निर्माण झाला आहे. 
 
याच विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली असून संभाजी भिडे यांचा तो व्हिडिओ तपासला जाईल आणि त्यात काही असंवैधानिक आढळले तर कारवाई केली जाईल, असे  नागपूर येथे सांगितले. हे सरकार ज्ञानोबा आणि तुकोबांच्या विचारांचे आहे. सरकार मनुचे समर्थन करत नसल्याचे सांगत आम्ही राज्यघटना माननारे असल्याचेही ते म्हणाले. 

 
नेमके काय म्हणाले संभाजी भिडे 
 
मनुने गावपातळीपासून संघटनात्मक बांधणी करून हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालण्यास शिकवले. मनू हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता. ज्यांचा हिंदुत्वावर विश्वास आहे त्यांनी गावागावात जाऊन संमेलने घ्यावीत. सध्या देशाला वाचविण्यासाठी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याची गरज आहे. तसेच बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य पाहिजे पण ते वढू, रायगडाला मान्य नसल्याचे सांगत त्यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीलाही विरोध केला. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.