Chikhali : दहशत पसरविण्याच्या उद्देशाने तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – चिखली येथील टॉवर लाईन परिसरात आपली दहशत पसरविण्याच्या उद्देशाने चार जणांनी मिळून दोघांवर जीवघेणा हल्ला केला. लोखंडी कोयत्याने डोक्यात मारून डोक्यात काच फोडली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री साडेआठच्या सुमारास कृष्णानगर येथील सिमेंट ग्राउंड जवळ घडली.

यशपाल गौतम सरवदे (वय 23, रा. भालेकर चाळ, त्रिवेणीनगर, तळवडे) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याने याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार भंडारी, योगेश लहाने, गणेश तोरस्कर, पवन लष्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास फिर्यादी यशपाल कृष्णानगर येथील सिमेंट ग्राउंड जवळ मोटरसायकल घेऊन थांबला होता. त्यावेळी सर्व आरोपी त्याच्याजवळ आले आणि ‘टॉवर लाईनचे तुझे मित्र कुठे आहेत’ असे विचारले याबाबत यशपालने ‘मला माहिती नाही’ असे सांगितले. यानंतर आरोपी पुढे थोड्या अंतरावर गेले आणि परत माघारी आले. आरोपींनी ‘टॉवर लाईनचे त्याचे मित्र नसले म्हणून काय झाले, हा आहे याला मारून टाकू, म्हणजे टॉवर लाईनच्या मुलांमध्ये आपली दहशत बसेल’ असे म्हणत आरोपी योगेश लहाने याने यशपालच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने मारले. आरोपी गणेश आणि पवन यांनी यशपालला पकडले असता तुषार याने शेजारील आईस्क्रीमच्या हात गाडीवरील काचेच्या तीन ते चार ग्लास यशपालच्या डोक्यात फोडल्या.

त्यानंतर आरोपींनी रात्री सव्वा नऊच्या सुमारास म्हेत्रे वस्ती चिखली येथून यशपालचा मित्र रोहित गोपने हा घरी जात असताना त्यालाही कोयत्याने मारून जखमी केले. या दोन्ही हल्ल्यांमध्ये यशपाल आणि त्याचा मित्र रोहित हे दोघेही गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.