Chikhali : डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असलेल्या 19 वर्षीय तरुणाला डंपरने मागून धडक दिली. या धडकेत तरुण रस्त्यावर पडला. गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवारी) दुपारी पाचच्या सुमारास केएसबी चौकातील पुलावर कुदळवाडी कडे जाणा-या मार्गावर झाला.

ओंकार बाबूजी मोरे (वय 19, रा. हरगुडे वस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत ओंकार दुचाकीवरून कुदळवाडीच्या दिशेने जात होता. केएसबी चौकातील पुलावर आला असता त्याच्या दुचाकीला डंपरने मागून धडक दिली. या धडकेत ओंकार रस्त्यावर पडला. गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

डंपर चालकाने दुचाकीवरील तरुणाला अपघातानंतर देखील फरफटत नेले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले होते. संतप्त नागरिकांनी डंपर पेटवून दिला. एमआयडीसी भोसरी आणि पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन विभागाने डंपरच्या आगीवर नियंत्रण मिळवले. पिंपरी पोलीस याचा तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.