Chinchwad: वाल्हेकरवाडी प्रभाग 17मधील 680 गरजूंना किराणा किट वाटप

एमपीसी न्यूज – देशात आणि राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले असून सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे दिव्यांग, गरजू, गोरगरीब कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून, अशा गरजू लोकांची मदत करणे, हीच आमची समाजसेवा असल्याचे मत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी व्यक्त केले.

प्रभाग क्रमांक 17 मध्ये सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यावतीने प्रभागातील 680 दिव्यांग, गरजू, गोरगरीब , कामानिमित्त शहरात वास्तवात असलेले कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश येथील परप्रांतीय कुटुंबांना समांतर अंतर ठेवून किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच, गेली 10 दिवसांपासून 80 जेवणाचे डबे पुरविले जात असून झोपडपट्टी परिसरात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या संचारबंदीमुळे मोलमजूरी बंद आहे. हातावरचे पोट असलेल्या नागरिकांना एकवीस दिवस घरामध्ये बसून उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. काही लोक हे परराज्यातून कामासाठी शहरात वास्तव्यास आले आहेत. हाताला काम नसल्याने या कुटुंबांवरही उपासमारीची वेळ आली होती. गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस या कुटूंबांना किराणा साहित्याचे संपूर्ण किट देण्यात आले आहे.

कलम 144 चा भंग न करता प्रत्येक व्यक्तीमध्ये सामाजिक अंतर ठेवून कुठलीही गर्दी न करता लाभार्थींना मदत करण्यात आली. साधारण 15 दिवस पुरेल इतका किराणा साहित्य सदरील किटमध्ये देण्यात आला आहे. घरातील किराणामाल संपल्याने ही सगळी कुटुंबे मदतीच्या प्रतिक्षेत होती. किराणा साहित्य मिळाल्याने सदर कुटूंबियांना प्रचंड आनंद, समाधान व दिलासा मिळाल्याचे ढाके यावेळी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.