Chinchwad News : तुम्हाला माहिती आहे का काम कोणाचे आहे; ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन

सखोल चौकशी करून अधिकारी, सल्लागार, ठेकेदार, त्याच्या उद्धट कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – मोहननगर प्रवेशद्वार ते मेहता हॉस्पिटल दरम्यान सुरु असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. दहशत करून काम सुरू आहे. थोडा वेळ काम बंद करून दोन्ही बाजूने बॅरिकेट लावा आणि मग काम सुरू करा अशी विनंती केली असता. काम थांबणार नाही?तुम्हाला माहिती आहे का हे काम कोणाचे आहे? तुम्हाला काय करायचे ते करा असे उद्धटपणे ठेकेदारांचे लोक नागरिकांशी बोलत असल्याचा आरोप करत याची सखोल चौकशी करून अधिकारी, सल्लागार, ठेकेदार, त्याच्या उद्धट कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

बाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, मोहननगर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार ते मेहता हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे आदेश 17 जुलै 2019 रोजी इंगवले पाटील कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले. या कामाची मुदत 24 महिने म्हणजेच 16 जुलै 2021 पर्यंत होती. मात्र या मुदतीत संबंधित ठेकेदाराने केवळ 65 टक्के काम पूर्ण केले आहे.

तीन दिवसांपूर्वी मारुती मंदिर या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने अर्धा जुना रस्ता खोदायचे काम सुरू होते. दुसऱ्या बाजूला पूर्ण झालेल्या सिमेंटच्या रस्त्यावर डंपर उभा होता. या ट्रकमध्ये जेसीबीच्या साह्याने राडारोडा भरला जात होता. प्रवेशद्वार अथवा ईएसआय चौकात बॅरिकेट्स अथवा फलक नसल्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहने येऊन रस्ता जाम झाला होता. संबंधित ठेकेदाराची लोक वाहनचालकांना अतिशय उद्धटपणे मागे फिरा असा दम देऊन मागे पाठवत होते. मोठी कसरत करून वाहनचालकांना पुन्हा गाड्या मागे फिरावाव्या लागत होत्या‌.

त्यामुळे दोन्ही बाजूंनी बॅरिकेट का लावले नाहीत?लोकांना त्रास होत आहे ?तुम्ही थोडा वेळ काम बंद करून दोन्ही बाजूने बॅरिकेट लावा आणि मग काम सुरू करा अशी विनंती केली असता काम थांबणार नाही?तुम्हाला माहिती आहे का हे काम कोणाचे आहे? तुम्हाला काय करायचे ते करा अशे उद्धटपणे ते लोक बोलल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे.

मोहननगर आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कुठली ही काळजी घेतली जात नाही. रस्त्याच्या कडेला सेफ्टी टेप, बॅरिकेट्स व रिफ्लेक्टर लावले नाहीत. तसेच हे काम सुरू असताना कामात काळजी न घेता अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन तोडण्यात आल्या आहेत. भूमिगत विद्युत केबल वेळोवेळी तोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. परिसरातील नागरिकांचे जीवन सुरक्षित करावे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, सल्लागार, ठेकेदार व त्याच्या उद्धट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भापकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.