Chinchwad News : सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख बदलले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांवर जरब बसणारऱ्या सामाजिक सुरक्षा पथकाची धुरा पोलीस निरीक्षकाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षकाकडे देण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख बदलल्याने शहर पोलीस दलात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे हे या पथकाचे प्रमुख होते. त्यांच्याकडून ही जबाबदारी आता सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड शहराची धुरा सप्टेंबर 2020 मध्ये स्वीकारली. त्यानंतर शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना केली. या पथकाची जबाबदारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाने शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जोरात कारवाई केली. एक प्रकारे सामाजिक सुरक्षा पथकाने शहरातील अवैध धंदे चालवणाऱ्यांवर पोलिसांचा धाक निर्माण केला.

सामाजिक सुरक्षा पथक हे पोलीस आयुक्तांच्या गळ्यातील ताईत बनले. आयुक्तांना अपेक्षित असलेल्या कारवाया या पथकाकडून होत होत्या. दरम्यान पथकातील काही कर्मचाऱ्यांच्या मागील काही काळात बदल्या देखील करण्यात आल्या. त्यानंतर अचानक पथक प्रमुख विठ्ठल कुबडे यांची जबाबदारी काढून घेण्यात आली. तर ती जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्याकडे देण्यात आली.

विठ्ठल कुबडे यांना अद्याप कोणताही पदभार देण्यात आलेला नाही. पुढील आदेशापर्यंत सामाजिक सुरक्षा विभागाचा पदभार सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे यांच्याकडे असणार आहे. अचानक झालेल्या या बदलीमुळे शहर पोलीस वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.