BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांचे मुख्यालय चिंचवडमध्ये कार्यान्वित

0
INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव येथील स्वर्गीय अशोक कामठे बस स्थानकाजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेने व्यापारी संकुल उभारले आहे. या व्यापारी संकुलात वाहतूक पोलिसांचे मुख्यालय कार्यान्वित करण्यात आले आहे. लवकरच पोलीस आयुक्‍तांच्या हस्ते या मुख्यालयाचे औपचारिक उद्‌घाटन केले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्‍तालयामध्ये दहा वाहतूक विभाग आहेत. या विभागांमधून वाहतुकीचे नियमन केले जाते. तसेच शहरात कुठे वाहतूक कोंडी, अपघात झाल्यास वाहन चालक वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधतात. तसेच इतरही महत्वाच्या सूचना नियंत्रण कक्षाकडून दिल्या जातात. याशिवाय न्यायालयात खटले दाखल करणे, विविध कार्यक्रमासाठी परवानगी देणे, अशी कामे वाहतूक विभागाच्या मुख्यालयातून केली जातात.

चिंचवडगाव येथे उभारण्यात आलेल्या वाहतूक पोलीस मुख्यालयात उपायुक्‍त, सहायक आयुक्‍त, पोलीस निरीक्षक (नियोजन), पोलीस निरीक्षक (खटला) यांच्यासाठी केबिन तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष, समन्स बजावणी करणे व इतर कार्यालयीन कामकाजाकरिता जागा राखीव ठेवण्यात आली आहे. आगामी काळात या ठिकाणी शहरातील विविध चौकात बसविण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमे-यांचे प्रेक्षपणही घेतले जाणार आहे. त्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. याच इमारतीच्या दुसऱ्या भागात जागा रिक्‍त असून त्याठिकाणी पोलिसांचे अन्य कार्यालय सुरू करण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मानस आहे.

सध्या वाहतूक विभागाचा नियंत्रण कक्ष असला तरी लँडलाईन क्रमांक अद्याप मिळाले नाहीत. त्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी पाठपुरावा केला जातो. सध्या वाहतूक पोलिसांचा नियंत्रण कक्ष त्यांच्या वाॅकीटॉकी चॅनल आणि आयुक्तालयाच्या ट्विटरवर आलेल्या तक्रारी सोडवत आहे. नागरिकांना वाहतूक पोलिसांशी थेट संपर्क करण्यासाठी केवळ ट्विटर हेच एकमेव साधन सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालय होऊन वर्ष उलटले तरी वाहतूक नियंत्रण कक्षाला नंबर अद्याप मिळू शकले नाहीत.

HB_POST_END_FTR-A2

.