Chinchwad : पिंपरी-चिंचवड युवासेनेतर्फे तंबाखुमुक्त शाळा अभियान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड युवासेना व डॉ. कुणाल देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात तंबाखुमुक्त शाळा अभियान सुरु करण्यात आले. या अभियानाची सुरवात सोमवारी (दि. १) चिंचवडमधील केशवनगर शाळेमधून करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, महिला संघटिका उर्मिला काळभोर व नगरसेवक सुरेश भोईर, मुख्याध्यापक आर. डी.कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम एक वर्ष महापालिकांच्या शाळांमध्ये चालणार असून, या कार्यक्रमांचे आयोजन युवासेना पुणे जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे, पिंपरी विधानसभा अधिकारी अभिजित गोफण, युवती अधिकारी शर्वरी जळमकर, राहुल पालांडे व विनायक खामगळ यांनी केले. या कार्यक्रमात मुख्याध्यापक आर. डी.कुंभार, वंदना खंडागळे, सावली शिंदे, क्रांती शिंदे, भोलाराम पाटील व रविराज मांडवे, डॉ. रितिका देसाई, डॉ. सुहासिनी घाणेकर, डॉ, राहुल मणिहार आदी उपस्थित होते.

सध्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये व लहान मुलांमध्ये गुटखा, तंबाखु, सिगारेट, बिडी व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे व्यसन असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्या विरोधात जनजागृती करणे गरजेचे असल्याने युवासेना व डॉ. कुणाल देशमुख यांच्या माध्यमातून तंबाखूमुक्त शाळा व परिसर, असे अभियान राबविण्याचे ठरविले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. कुणाल देशमुख म्हणाले,”तंबाखु आरोग्यासाठी हानिकारक आहे, तंबाखूच्या व्यसनामुळे अनेक आजार होतात, कुटुंबाला त्रास होतो. देशाचे उद्याचे भवितव्य ज्याच्या हातामध्ये आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन जडले आहे. शाळेच्या ५०० मीटर परिसरामध्ये गुटखा, तंबाखु, सिगारेट, बिडी व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी असताना १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांना नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे विक्री करण्यात येत आहे” यावर बंदी घालण्याबाबत तंबाखुमुक्त शाळा अभियान राबविण्यास शासन सपशेल अपयशी ठरल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी युवासेनेच्या माध्यमातून तंबाखुमुक्त शाळा अभियान हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे व या उपक्रमाची खरोखर गरज असल्याने याबाबत संपूर्ण शिवसेना, डॉ. कुणाल देशमुख व युवासेना यांच्या पाठीशी ठाम उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.