Lonavala : शहरातील 17 इमारती धोकादायक

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील 17 धोकादायक इमारतींना लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने नोटीसा बजावत त्या तातडीने खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व इमारतींचे बांधकाम 50 वर्षाहून अधिक जुने असून त्या मोडकळीस आल्या आहेत. यापैकी काही अति धोकादायक इमारतींना यापूर्वी देखील नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

धोकादायक इमारतीपैकी भांगरवाडी (अ वाॅर्ड) विभागातील सात इमारती, गावठाण (ई वाॅर्ड) चार इमारती, सोनार गल्ली (एफ वाॅर्ड) येथील दोन इमारती तसेच जुना बाजार (डी वाॅर्ड), नांगरगाव, तुंगार्ली व खंडाळा विभागातील प्रत्येकी एक इमारत धोकादायक स्थितीमध्ये असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

मागील चार पाच दिवसात राज्यभरात मुसळधार पावसामुळे पुणे, मुंबईसह अन्य ठिकाणी धोकादायक इमारती व भिंती कोसळून पन्नासहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लोणावळा हे पावसाचे ठिकाण असल्याने पावसाळा सुरु होण्यापुर्वीच शहरातील धोकादायक बांधकामांची पाहणी करण्यात आली होती. यानुसार धोकादायक स्थितीत असलेल्या 17 जुन्या बांधकामांना कलम 195 प्रमाणे नोटीस बज‍वण्यात आल्या आहेत.

सदरच्या इमारती रहिवासाकरिता धोकादायक असल्याने त्यामध्ये नागरिकांनी राहू नये, काही दुर्घटना घडल्यास जिवितहानी होण्याची शक्यता असल्याने नगरपरिषदेने संबंधित जागा मालकांना खबरदारीचा इशारा दिला असल्याची माहिती पवार यांनी दिली. भांगरवाडी, गावठाण भागातील काही इमारती अतिधोकादायक स्थितीमध्ये आहेत. जागेच्या वादाची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने नगरपरिषद देखील अशा बांधकामांवर कारवाई करत नाही. मात्र सदर इमारतीमध्ये राहणे धोकादायक असल्याने संबंधित नागरिकांनी जिविताचा विचार करत इमारत खाली करावी अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.