Lonavala : साबरमतीच्या धर्तीवर इंद्रायणी नदीच्या विकासाचा संकल्प

एमपीसे न्यूज- गुजरात राज्याची ओळख बनलेल्या साबरमती नदीच्या धर्तीवर लोणावळा शहरातून उगम पावणार्‍या इंद्रायणी नदीचा विकास करण्याचा नवसंकल्प लोणावळा नगरपरिषदेने नवीन वर्षात केला आहे.

गुजरात राज्यात ज्या पध्दतीने साबरमती नदीचा विकास करत रिव्हर फ्रंट बनविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर लोणावळा शहरातून उगम पावणारी व वाहणारी इंद्रायणी नदी विकसित करण्याचा मनोदया मनात ठेवून अभ्यास दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. गुजरात राज्याने साबरमती रिव्हर फ्रंट, स्टॅच्यु आँफ युनिटी, ग्लो गार्डन, न्युट्रेशन पार्क, पटेल सरोवर, लेजर शो, ट्रेंट सिटी, उद्यान विकास, फ्लाॅवर शो द्वारे पर्यटकांना आकर्षित केले आले आहे. त्याच धर्तीवर पर्यटकांचे आकर्षण स्थळ असलेल्या लोणावळा शहरात विकास करत पर्यटन वाढीवर भर देण्याकरिता भविष्यात काम करण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आला. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी लोणावळ्याच्या शिष्टमंडळाला तब्बल अर्धा तासाचा वेळ देत गुजरात राज्यात कशा पध्दतीने पर्यटन विकासाचे काम केले आहे याबाबत माहिती दिली. यावेळी अहमदाबादच्या महापौर बिजल पटेल या देखील उपस्थित होत्या.

लोणावळा शहरातून उगम पावत देहू, आळंदी ते थेट पंढरपुर पर्यत वेगवेगळ्या रुपात वाहणार्‍या इंद्रायणी नदीला महाराष्ट्रात विशेष महत्व आहे. वारकरी संप्रदाय या नदीचे पाणी गंगासमान समजतात. मात्र प्रदूषणामुळे इंद्रायणी नदीची अवस्था बिकट झाली असून जलपर्णीमुळे नदीचा जीव गुदमरला आहे. लोणावळा नगरपरिषदेने नदीपात्रात सोडलेल्या ड्रेनेज लाईन बंद करण्याचे काम नुकतेच हाती घेतले असून भुयारी गटार व ड्रेनेज लाईनद्वारे सर्व खराब पाणी मलशुध्दिकरण प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्र दूषितपाणी मुक्त होणार आहे.

येत्या काळात शहरातून वाहणार्‍या या नदीपात्राला दुतर्फा रिटेनिंग वाॅल बांधत, नदीपात्रातील प्रदूषण रोखण्यात येणार आहे. तसेच उपलब्ध असलेल्या जागेत लहान गार्डन, पायी चालण्याकरिता फुटपाथ, खेळणी, बसण्याकरिता बाकडे, नदीपात्रात चांगले पाणी हे उपाय करत इंद्रायणी नदीचा विकास करण्यात येणार आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज गार्डन व इतर उद्याने यांचा पर्यटनात्मक विकास करत त्याठिकाणी लेजर शो, वाॅटर फाउंटन असे प्रयोग, खंडाळा बोटिंग प्रकल्प सुरु करत पर्यटन वाढीवर भर देण्याचा मनोदया नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व नगरसेवकांनी व्यक्त केला.

लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, काँग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, आरोग्य समिती सभापती संध्या खंडेलवाल, भाजपाचे गटनेते व पाणी पुरवठा सभापती देविदास कडू, शिक्षण समिती सभापती भरत हारपुडे, बांधकाम सभापती संजय घोणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुवर्णा अकोलकर, उपसभापती गौरी मावकर, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती मंदा सोनवणे, आरोग्य समितीच्या माजी सभापती पूजा गायकवाड, ब्रिंदा गणात्रा, ज्येष्ठ नगरसेवक राजु बच्चे, रिपाईचे नगरसेवक दिलीप दामोदरे, रचना सिनकर, सुधीर शिर्के, शिवसेना नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे, सिंधु परदेशी, सामाजिक कार्यकर्त्या शैलजा फासे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, अनिस गणात्रा यांच्यासह शिष्टमंडळाने गुजरातचा दौरा करत मुख्यमंत्री विजय रुपानी यांची भेट घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.