PCMC News: महापलिका शहरात 100 ठिकाणी बसविणार “क्‍लोथ बॅग वेंडींग” मशीन

एमपीसी न्यूज – प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कापडी पिशव्या वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठी पालिका शहरातील 100 महत्वाच्या ठिकाणी “क्‍लोथ बॅग वेडींग” मशीन बसविणार आहे. यासाठी जागा निश्‍चित झाली आहे.

प्लॅस्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना केंद्र सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. प्लॅस्टिक बंदीसाठी महापालिकेसह शहरातील पर्यावरणासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थाही जनजागृती करत आहेत. मात्र, प्लॅस्टिक बंदीची म्हणावी तशी अंमलबजावणी होत नाही. प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाने कापडी पिशव्यांना प्रोत्साहन देण्याचे नियोजन केले आहे.

त्यासाठी शहरातील बाजारपेठेची ठिकाणे, भाजी मंडई, यासह गर्दीच्या ठिकाणी 100 “क्‍लोथ बॅग वेडींग” मशीन बसविण्यात येणार आहेत. यासाठी जागाही निश्‍चित करण्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्वावर महापालिकेत “क्‍लोथ बॅग वेडींग” मशीन बसविण्यात आली आहे. मात्र, ही मशीन लहान असून यापेक्षा मोठी मशीन बसविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यानुसार भांडार विभागाने मोठ्या “क्‍लोथ बॅग वेडींग” मशीनचा नमुना आणला आहे. हे मशीन आयुक्त शेखर सिंह यांना दाखविण्यात आले आहे. आयुक्तांचा क्‍लोथ बॅग वेडींग मशीनसाठी होकार आल्यानंतर मशीन अंतिम होणार आहे.

याबाबत आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर म्हणाले, शहरातील 100 महत्वाच्या ठिकाणी “क्‍लोथ बॅग वेडींग” मशीन बसविण्यात येणार आहे. जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. 5 आणि 10 रूपयांना या पिशव्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच कापडी पिशव्या बनविण्याचे काम बचत गटांना देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.