Dehugaon : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज

एमपीसी न्यूज – जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या स्वागतासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे.

भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी संस्थानच्या वतीने मुख्य देऊळवाडा आणि वैकुंठस्थान मंदिर परिसरात सोळा व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली.

संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे म्हणाले, ‘‘बीज सोहळ्यासाठी वारकऱ्यांच्या गर्दीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी संस्थानने तयारी केली आहे. भाविकांच्या पिण्याचे पाणी आणि आरोग्याच्या दृष्टीने संस्थानने काळजी घेतली आहे. मुख्य देऊळवाडा, वैकुंठस्थान मंदिराला रंगरंगोटी करण्यात येत आहे. देऊळवाड्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. देऊळवाड्यासमोर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. देऊळवाडा, वैकुंठस्थान येथे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. विविध दिंडीकरी, मानकरी यांना पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. इंद्रायणी घाट परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. संस्थानने मुख्य देऊळवाडा परिसरात स्वच्छतेसाठी तीस कर्मचारी नियुक्त केले आहेत. वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली आहे. खासगी सुरक्षारक्षक नेमले आहेत. संस्थानने भाविकांना अल्प दरात गाथा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सोहळ्यासाठी सहा हजार गाथा उपलब्ध आहेत”

यावेळी संस्थानचे विश्‍वस्त अशोक मोरे, सुनील दा. मोरे, सुनील दि. मोरे, अभिजित मोरे, जालिंदर महाराज मोरे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.