Dehugaon : गायरान जमीन पोलिसांना देण्यास देहुकरांचा विरोध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांना देहूगाव येथील गायरान जमीन(Dehugaon) देऊ नये अशी आग्रही भूमिका देहूकरांनी घेतली आहे. आपला विरोध प्रदर्शित करण्यासाठी शुक्रवारी (दि. 13) देहूगाव बंद ठेवण्यात आले. गायरानाची जागा मिळवून त्याठिकाणी अनेक विकासकामे करायची आहेत. पोलिसांना जागा दिल्यास नियोजित विकासकामे करता येणार नसल्याची देहूकरांची भूमिका आहे.

तीर्थक्षेत्र देहू येथील सर्वे नंबर 97 ही 189 एकर गायरान जमीन आहे.(Dehugaon)यातील 50 एकर जागा पिंपरी-चिंचवड पोलिसांना देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरु आहेत. त्या ठिकाणी पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांचे मुख्यालय, परेड मैदान, शस्त्रागार निर्माण करायचे आहे. त्यामुळे पोलिसांकडून या जागेची मागणी केली जात आहे.

Chinchwad : शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवले नाही, तर तीव्र आंदोलन करू; मनसेचा प्रशासनाला इशारा

या ठिकाणी पोलिसांना 50 एकर जागा दिल्यास देहूगाव नगरपंचायतच्या नियोजित विकासकामांसाठी जागा अपुरी पडणार असल्याचे देहुकरांचे मत आहे. त्यामुळे देहूकरांनी पोलिसांना जागा देण्यास विरोध दर्शवला आहे.

देहूगावच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण म्हणाल्या, देहूगाव येथे असलेली गायरान जागा विविध विकासकामांसाठी वर्ग करून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. देहूगावसाठी 100 बेडचे रुग्णालय मंजूर आहे. मात्र त्यासाठी जागा नसल्याने त्याचे काम करणे अशक्य होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या जागेबाबत पाठपुरावा सुरु आहे. ही जागा पोलिसांना देऊ नये यासाठी आम्ही प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.

शैलेश चव्हाण म्हणाले, “देहूगावसाठी रुग्णालय मंजूर आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात त्यासाठी निधी वर्ग करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे. ही जागा पोलिसांना न देता नगरपंचायतकडे वर्ग करावी या मागणीसाठी आम्ही पुढील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहोत.

म्हणून देहूकरांचा जागा देण्यास विरोध
देहूगाव येथे असलेली 189 एकर जागा नगरपंचायतकडे वर्ग करण्याबाबत नगरपंचायतकडून प्रयत्न सुरु आहे. त्या ठिकाणी क्रीडांगण, रुग्णालय, उद्यान, सांस्कृतिक भवन, भक्त निवास, अन्नछत्र, वाहनतळ, विश्रामगृह, संग्रहालय उभारण्याचे नियोजित आहे. गावजत्रा, आषाढी, कार्तिकी पालखी सोहळा, संत तुकाराम महाराज बीज सोहळा, अध्यात्मिक, धार्मिक कार्यक्रम अशा विविध कारणांसाठी जागेची नितांत आवश्यकता आहे. ही जागा वगळता देहूकरांसाठी दुसरी कोणतीही एवढी मोठी जागा नाही. त्यामुळे देहूकर यातील जागा पोलिसांना देण्यास विरोध करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.