DehuNews: देहू – आळंदी रस्त्यावर महापालिकेच्या प्रवेशद्वारात स्वागत कमान उभारणार

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीच्या प्रवेशद्वारावर आळंदी आणि देहू रस्त्यावर स्वागत कमान उभारण्यात येणार आहे. देहू येथे महापालिका हद्दीवर उभारण्यात येणा-या या कमानीसाठी 1 कोटी 40 लाख रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीलगत पूर्वेस आळंदी आणि पश्चिमेस देहूगाव अशी दोन तीर्थक्षेत्रे आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी, भाविक आळंदी आणि देहू येथे येत असतात. सद्य:स्थितीत देहू – आळंदी हा मार्ग बीआरटीएस विभागामार्फत विकसित करण्यात आला आहे. याच 30 मीटर रुंदीच्या मार्गावरून भाविक आळंदी ते देहू असा पायी प्रवास करतात. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर इतर राज्यांतूनही या तीर्थक्षेत्रास भेट देण्यासाठी भाविक येत असतात. त्यांचा या मार्गावरील बहुतेक सर्वच प्रवास पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतून होत असतो. तथापि, या मार्गावर महापालिकेमार्फत कोठेही स्वागत कमान उभारलेली नाही. या रस्त्यावर महापालिका हद्दीत देहूकडून येताना तळवडे परिसराच्या सुरुवातीस स्वागत कमान उभारण्याची स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

नागरिकांची मागणी लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने देहू – आळंदी रस्त्यावर देहू येथे महापालिका हद्दीवर कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी  इच्छुक ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 1 कोटी 70 लाख रुपये अपेक्षित धरण्यात आला. त्यानुसार चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यामध्ये रायकॉन कन्स्ट्रक्शन यांचा 18.28 टक्के इतका लघुत्तम म्हणजेच 1 कोटी 39  लाख 33 हजार रुपये दर प्राप्त झाला आहे. रॉयल्टी चार्जेस 85 हजार रुपये आणि मटेरियल टेस्टिंग चार्जेसपोटी 10 हजार 450 रुपये असा एकूण 1 कोटी 40 लाख 29 हजार रुपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.