Dehuroad : देहूरोड येथील उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोड येथे नव्याने बांधण्यात आलेला उड्डाणपूल रविवार (दि.3) पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे देहूरोड येथील वाहतूक कोंडीची सुटका झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे उपस्थित होते.

देहूरोड येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गतवर्षी निगडी ते देहूरोडदरम्यान रस्ता रुंदीकरण आणि नवीन उड्डाणपुलाचे हाती घेतले होते. त्यातील उड्डाणपुलाचे काम टी.अ‍ॅण्ड टी. कंपनीतर्फे करण्यात आले आहे. पुलाची निविदा 43 कोटी रुपयांची होती. 18 महिन्यात हे काम पूर्ण झाले आहे. पुलाची लांबी एक किलोमीटर असून रुंदी 17.100 मीटर आहे. तर, दुभाजकाची रुंदी 1.100 मीटर आहे. सुरक्षा कठडे एक मीटर उंचीचे आहेत. तर, 24 खांब आहेत. प्रकाशासाठी 90 एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.

या पुलामुळे वर्दळीच्या स्वामी चौक, जुना बँक ऑफ इंडिया चौक, सॅमसन हायस्कूल चौक आणि शिवाजीनगर रस्ता असे चार चौक आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूंना सेवा रस्ता असून निगडीकडून देहूरोड बाजारपेठ, मामुर्डी, किवळे, विकासनगर भागात जाणा-यांना सेवा रस्ता निर्माण झाला आहे. देहूरोड येथील वाहतूक कोडींची सुटका झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.