Dehuroad News : चिंचोली गावातील वीज समस्या सोडवा ; ग्रामस्थांची महावितरणकडे मागणी

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील चिंचोली गावात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी तातडीने भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग सावंत, माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत आणि निवृत्ती बालघरे यांनी निगडी-प्राधिकरण येथील महावितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता चौधरी यांनी भेट घेतली. तसेच चिंचोलीतील विजेच्या समस्यांचा पाढाच चौधरी यांच्या समोर वाचला.

चिंचोली गावात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत. गावात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचा प्रस्ताव सन 2015 मध्ये मंजूर झाला होता. मात्र, अद्यापही हे काम न झाल्याने गावातील वीज पुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरुच आहे.

त्याचबरोबर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर चिंचोली ते झेंडेमळा या दरम्यान रस्त्यावर वीज वाहक तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका संभवत असल्याकडे चौधरी यांचे लक्ष वेधण्यात आले.

दरम्यान, चिंचोली गावातील वीज समस्या सोडविण्यासाठी लवकरच गावात पाहणी करणार असल्याचे चौधरी यांनी सांगितल्याची माहिती संजय सावंत यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.