Maval News : कुसगाव पोलीस पाटील भरतीप्रकरणी प्रदीप नाईक यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कुसगावच्या पोलीस पाटील भरती प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी जिल्हा प्रशासनाला पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना नाईक म्हणाले, सन 2017 मध्ये राज्य शासनाने पोलीस पाटील पदासाठी परीक्षा घेतल्या. नियमाप्रमाणे निवड यादीनुसार प्रथम क्रमांक असलेल्या उमेदवाराची निवड पोलीस पाटील पदावर झाली.

काही दिवसांनी शासनाच्या असे लक्षात आले की, या प्रथम क्रमांकावर असलेल्या उमेदवाराची निवड ही नियमबाह्य तसेच शासनाची फसवणूक करून झाली आहे. तेव्हा ताबडतोब या उमेदवाराला पदावरून हटविण्यात आले.

आता नियमानुसार पहिल्या उमेदवाराची निवड रद्द झाल्याने, त्या रिक्त झालेल्या जागेवर निवड यादीतील द्वितीय क्रमांकावर असलेले उमेदवार किसन महादू गुंड यांना नेमणूक पत्र शासनाने द्यायला हवे होते. परंतु तसे न झाल्याने दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार किसन गुंड यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात मावळ, मुळशीचे उपविभागीय अधिकारी सुभाष बागडे यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केले.

या निवेदनावर स्थानिक प्रशासनातर्फे कुठलीही कार्यवाही झाली नाही. म्हणून किसन महादू गुंड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट) यांच्याकडे आपली तक्रार लेखी स्वरूपात नोंदविली.

या तक्रारीची दखल मॅटने घेतली. त्यानंतर मॅटने उपविभागीय अधिकारी यांना या संदर्भात आदेश जारी केले. त्या आदेशात असे स्पष्ट केले आहे की, ‘सदर प्रकरणाची चौकशी करून उमेदवार निवडीबाबत 30 दिवसात निर्णय घेऊन या विषयी अहवाल सादर करण्यात यावा.

परंतु, या आदेशाची अंमलबजावणी उपविभागीय अधिकारी सुभाष बागडे यांनी केली नाही. तसेच त्यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी बदलून आलेले उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी देखील हा अहवाल मॅटकडे सादर केला नाही. त्यामुळे हा मॅटचा अवमान आहे, असे नाईक म्हणाले.

प्रदीप नाईक यांनी माहिती अधिकारात ही माहिती मागविली. त्यामध्ये या अधिकाऱ्यांनी आपल्या चुकीची कबुली दिली. 28 जून रोजी नाईक यांनी पुणे विभागीय उप आयुक्त प्रताप जाधव यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगितली. त्यांना या बाबत आठ दिवसात निर्णय घेण्याची विनंती केली;अन्यथा कुसगांव ग्रामस्थ, सदर उमेदवार आणि प्रदीप नाईक जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला, अटक झाली तरी चालेल, असे नाईक म्हणाले.

या संदर्भात नाईक यांनी नुकतीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. त्यांनी देखील अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देऊ, असे सांगितल्याचे प्रदीप नाईक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.