Chinchwad Crime News : सराफाची सहा लाखांची फसवणूक करून सात वर्षांपासून फरार झालेल्या आरोपीला बेड्या

एमपीसी न्यूज – सराफाच्या दुकानातून चेक देऊन सहा लाख 15 हजारांचे हिरे आणि सोन्याचे दागिने नेऊन फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. या आरोपीला न्यायालयाने फरार घोषित केले होते.

शरद प्रकाश घाडगे (वय 36, रा. शिक्रापुर रोड, मेदनकरवाडी, चाकण, पुणे. मुळपत्ता. पांडवनगर, भोसरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल 2014 रोजी एम्पायर इस्टेट, चिंचवड येथील कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स या सराफी दुकानात चेक देऊन एकाने सोने व हिऱ्याचे दागिने बुक केले. त्यानंतर चेक पास झाला, असे भासवून कृष्णा राजाराम अष्टेकर या दुकानातून सहा लाख 18 हजार 285 रुपयांचे सोन्याचे व हिऱ्याचे दागिने आरोपीने नेले. या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुकानदाराने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्हा केल्यापासून आरोपी शरद घाडगे हा फरार होता. बरीच वर्ष शोध घेऊनही तो सापडत नसल्याने पिंपरी न्यायालयाने त्याला फरारी घोषित केले.

28 जून रोजी चाकण परिसरात गस्त घालत असताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, वरील फसवणूक प्रकरणातील आरोपी चाकण -आंबेठाण रोडवर, आंबेठाण गावाच्या कमानी जवळ, आंबेठाण येथे उभा आहे.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून आरोपी शरद घाडगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केला. त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उप निरीक्षक शाकीर जिनेडी, तसेच पोलीस अंमलदार, सुनिल कानगुडे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, अशोक दुधवणे, निशांत काळे, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, सुधीर डोळस यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.