Dehugon : श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

एमपीसी न्यूज – होय होय वारकरी। पाहे पाहे पंढरी। काय करावी साधने। फळ अवधेची येणे ॥ या अभंगाप्रमाणे विठ्ठलाच्या भेटीची आस मनात धरत लाखो वारकऱ्यांनी गळ्यात तुळशीमाळा, कपाळी गोपीचंदन टिळा, हातात टाळ, खांद्यावर भगव्या पताका घेत भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज (शनिवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास पंढरपूरला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

Dehugaon : लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीसागर पंढरपूरकडे  

विठूरायाच्या भेटीची आर्त ओढ लागलेल्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो विठ्ठलभक्तांमध्ये चैतन्य निर्माण झाले होते. पालखीचे यंदाचे ३३८ वे वर्षे आहे. प्रस्थान सोहळयाच्या निमित्ताने पहाटे पासूनच वारकऱ्यांची लगबग सूरु होती.पहाटे प्रातविधि आटोपून इंद्रायणी नदी घाटावर स्नान विधीसाठी भाविनी गर्दी केली होती.

पहाटे पासूनच मुख्यमंदिर, जन्मस्थान व वैकुंठस्थान मंदिरात दर्शनासाठी वारकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. पहाटे पाच वाजता विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते हस्ते महापूजा,संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात भानुदास महाराज मोरे,अजित महाराज मोरे, वैकुंठस्थान मंदिरात संजय महाराज मोरे, पालखी सोहळयाचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदीरात पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे,माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

यावेळी संस्थानचे विश्वस्त, महाराजांचे वंशज आदी उपस्थित होते. पालखी सोहळ्यानिमित्त सुरू असलेले अखंड हरिनाम सप्ताहाची देहूकर महाराजांचे काल्याचे किर्तनानी सांगता झाली.

दुपारी दोन वाजता सभा मंडपात पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. त्यानंतर साडे तीनच्या सुमारास पालखीने प्रस्थान ठेवले. पालखीचा सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इनामदार वाड्यात विसावली. उद्या सकाळी अकराच्या सुमारास पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात पालखीचा दुसरा मुक्काम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.