Dehugaon : लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीसागर पंढरपूरकडे  

एमपीसी न्यूज :  जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३८ व्या आषाढीवारी पायी पालखी सोहळ्यासाठी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आणि वैष्णव बांधव भक्तीनाद करीत हा वारकऱ्यांचा महासागर आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूरकडे निघाला.

Dehugon : श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान

अत्यंत भक्तीमय, उत्साही आणि प्रसन्न वातावरण, घामांच्या धारांनी जलाभिषेक करीत वैष्णवांचे दैवत असलेल्या पांडूरंगाच्या भेटीला तुतारी, टाळ, चिपळ्या आणि मृदंगाचा गजर  विण्याचा झंकार करीत तमाम वैष्णवगण ध्येयभान विसरूण विविध पाऊले खेळत, हरिनामासह ज्ञानोबा तुकाराम नामाचा जप करीत  श्री संत तुकाराम महाराजांची पालखी भाविकांच्या साक्षीने शनिवारी दुपारी २ वाजता पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सप्तनीक, खासदार श्रीरंग बारणे, विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, आमदार सुनिल शेळके, व त्यांच्या पत्नी सारीका शेळके, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, माजी मंत्री संजय भेगडे,  माजी आमदार विलास लांडे, हर्षवर्धन पाटील देहूकर दिंडीतील वारकरी विक्रम महाराज माळवे यांच्या हस्ते विधीवत महापूजा झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरवात झाली.

दरम्यानच्या काळात मंदिराच्या आवारात चोपदाराचा दंड आणि शिंगाड्याच्या आवाज होताच साऱ्या आसमंतांत मृदंग, टाळ, विणा यांच्या निनाद गुजला आणि सार देऊळवाडा ज्ञानोबा तुकारामचा गजर टिपेला पोहचला. आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका आणि महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘‘ज्ञानोबा- तुकाराम’’ हा जयघोष करीत हा पालखी सोहळा लाखो भाविकांचा भक्तीचा महासागर पंढरीच्या वाटेला लागला.  मंदिर प्रदक्षिणा करून हा पालखी सोहळा सायंकाळी सहाच्या सुमारास इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी विसावला.

श्री क्षेत्र देहूगावमध्ये (Dehugaon) पालखीचे प्रस्थान असल्याने  मुख्य मंदिर, वैंकुठगमण मंदिर परिसरातील इंद्रायणी नदी काठ पहाटे पासूनच फुललेला होता. या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले वारकरी हा विलोभनिय सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत जीवनाचे सार्थक झाले म्हणत धन्य झाल्याची भावना व्यक्त करीत होते.

प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मीनी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे व विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. श्री संत तुकाराम महाराज शीळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. पहाटे साडे पाच  वाजता  तपोनिधी पालखी सोहळ्याचे जनक नारायण महाराजांच्या समाधि मंदिरात महापूजा संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्थ य़ांच्या हस्ते करण्यात आली.

सहा वाजता विश्वस्त यांच्या हस्ते वैंकुठगमण मंदिरात महापूजा करण्यात आली. जन्मस्थान मंदिरातील महापूजा कैलास महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. सकाळी दहा वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याच्या काल्याचे किर्तन देहूकर महाराजांच्या वतीने पुंडलिक महाराज मोरे यांनी केले.  दरम्यानच्या काळात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास म्हसलेकर मंडळीच्या वतीने प्रल्हाद सोळंकी यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका सुनिल घोडेकर सराफ व  त्यांच्या कुटुंबियांकडील चकाकी दिलेल्या पादुका आणण्यासाठी पालखी सोहळ्यातील सर्वात जुनी असलेली म्हतारबुवा दिंडी व मानकरी गंगा म्हसलेकर हे घोडेकर यांच्या वाड्यात दाखल झाले.

येथे अभंग आरती झाल्यानंतर प्रल्हाद सोळंकी म्हसलेकरांनी या पादुका डोक्यावर घेऊन इनामदार वाड्यात आणल्या येथे दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते पादुकांची विधीवत महापूजा करण्यात आली. या पादुका काल्याचे किर्तन झाल्यानंतर आणि इनामदार वाड्यातील पूजा उरकल्यानंतर पालखीचे मानकरी प्रल्हाद सोळंकी, किसन सोळंकी, जयवंत सोळंकी, भागवत सोळंकी या गंगा, म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या.  म्हतारबा दिंडीसह ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या तालवर भक्तीमय वातावरणात मुख्यमंदिरात आणण्यात आल्या. मंदिराला प्रदक्षिणा घालुन भजनी या पादुका मंडपात प्रस्थान स्थली आणण्यात आणल्या.

याच वेळी प्रस्तान सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी आलेल्या दिंड्या आपआपल्या क्रमाने मुख्यमंदिरात प्रवेश करीत होत्या. या सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्या, फडकरी व विणेकरी यांनी महाद्वारातून मंदिराच्या आवारात येऊन भजन म्हणत आपला शीन भाग घालवत पावले खेळत मंदिराला प्रदक्षिणा घालत होते व उत्तर दरवाजाने बाहेर पडत होत्या.  यंदा प्रथमच पालखी प्रस्थानाचा कार्यक्रम अहिल्याबाई होळकर मंडपात घेण्यात आला. व इतर भाविकांची भजनी मंडपात बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

दुपारी 2 वाजता प्रस्तान सोहळ्याला सुरवात झाली. याप्रस्थान सोहळ्याची विधीवत पूजा ग्रामोपाध्याय सुभाष टंकसाळे व संतोष वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धरती, वायू, अग्नी, जल, आकाश यांच्यासह पाद्य पूजा व कलशपूजा करण्यात आली. प्रथम श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली.

यानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा उपस्थितांच्या हस्ते करण्यात आली.  यावेळी  प्रांताधिकारी संजय असवले, अप्पर तहसिलदार अर्चना निकम, देहूच्या (Dehugaon) नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा शितल हगवणे, सर्व नगरसेवक व आदी पदाधिकारी व दिंड्याचे विणेकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालखी सोहळा प्रमुख  संजय मोरे, भानुदाल मोरे, अजित महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे व विशाल महाराज मोरे आदी उपस्थित होते. पूजेनंतर आरती घेण्यात आल्यानंतर उपस्थितांच्या हस्ते पादुका पालखीत ठेवत प्रस्थान ठेवले. मानकऱ्यांना व दिंडीकऱ्यांना संस्थानच्या वतीने नारळ प्रसादाने सन्मानीत करण्यात आले. यानंतर पालखीचे प्रमुख चोपदार नामदेव गिराम, महेश देशमुख, कानसुलकर, अध्यक्षांचे चोपदार तुकाराम गिराम, नारायम खैरे, सेवेकरी देवाच्या पालखीचे परिट महादेव शिंदे, सेवेकरी तानाजी कळमकर, गुंडाप्पा कांबळे, बाळू चव्हाण, नामदेव भिंगारदिवे यांच्यासह सर्व मानकऱ्यांना व सेवेकरी मंडळींना संस्थानच्या वतीन नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.

प्रथेप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या पादुका उपस्थितांच्या हस्ते फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवण्यात आल्या. महाराजांच्या पादुका पालखीत ठेवल्यानंतर सेवेकरी भोई व मानकऱ्यांनी आपली सेवा बजावली. मानाचे पालखीचे भोई तानाजी कळंबकर, गुंडाप्पा कांबळे व  बाळू चव्हाण, नामदेव भिंगारदिवे, यांच्यासह भाविकांनीही खांदा दिला.

याच वेळी तुतारी धारक पोपट तांबे यांनी तुतारी फुंकली. भाविकांनी उपस्थित वारकऱ्यांनी एकच जल्लोश करीत ज्ञानेश्वर माऊली तुकाराम नामाचा जयघोष करण्यास सुरवात केली या जयघोषाने सारा आसमंता दणानून गेला तर वारकऱ्यांनी आपल्या भागवत धर्माच्या पताका उंचावून शंख नादात चौघडा व ताशांचा गजर केला. पालखी भजनी मंडपातून पालखी बाहेर येताच दिंड्यांत सहभागी असलेल्या वारकऱ्यांमध्ये उत्साह भरला, त्यांच्या मुखातुन आपोआपल अभंगाचे बोल बाहेर पडत होते.

हातातील टाळ विना मृदंगाच्या तालावर पावले थिरत होती, ही पावले कोट प्रकारात आपले खेळ करीत भक्तीरसात न्हाऊन निघाले होते व वातावरणांत दंग झाले होते.  वारकऱ्यांमध्ये फुगड्यांचा खेळ रंगु लागला होता, सारी देहूनगरी भक्तीमय झाली होती.  दरम्यान बाभूळगावकर आणि अकलुजचे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अश्वांसह शाही थाटात पालखी देऊळवाड्यातील मुख्य मंदिरासह संत तुकाराम महाराज शिळा मंदिराला प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर पडली. मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर पालखी मोठ्या भक्तीमय वातावरणात मंदिराच्या आवारातून साडे पाचच्या सुमारास मंदिराच्याबाहेर पडली व पहिल्या मुक्कामासाठी वाजत गाजत इनामदारकडे गेली.

https://youtu.be/XGtgKVpZ00U

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.