Dighi : ‘सीएमई’ हद्दीतील सांडपाणी प्रकल्पाला संरक्षण विभागाचा ‘हिरवा कंदील’

एमपीसी न्यूज – कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (CME) च्या हद्दीतील 45 एमएलडी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP), पंपिंग स्टेशन आणि संबंधित कामांना संरक्षण विभागाने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून साडेसहा एकर जागेत हा प्रकल्प सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Dehugaon : लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीसागर पंढरपूरकडे  

दिघी (Dighi) आणि भोसरी परिसरातील वाढते शहरीकरण व त्या तुलनेत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उपलब्ध नव्हते. तसेच महापालिका पालिका हद्दीत आरक्षण विकसित करण्यासाठी पर्याय नव्हता. त्यामुळे सीएमई हद्दीत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी 2021 मध्ये केली होती.

त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये महापालिका प्रशासनाने तसा प्रस्ताव संरक्षण विभागाकडे पाठवला होता. त्याअनुसरून, संरक्षण विभागाचे सचिव आर. एस. यादव यांनी सीएमई हद्दीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि संबंधित कामे करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासानाला  ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे.

महापालिका प्रशासनाने सप्टेंबर 2021 मध्ये सीएमई परिसरात पाहणी दौरा केला होता. मोकाट जनावरे, अतिक्रमण, रस्ते, नाल्यांची सफाई, सांडपाणी व्यवस्था अशा अनेक समस्यांबाबत संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती. भोसरी आणि दिघी (Dighi) परिसरातून नाल्यांद्वारे सीएमई हद्दीत येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुमारे 10 एकर जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी त्यावेळी महापालिका प्रशासनाने केली होती. या जागेत एसटीपीसह पंप हाउस, सम्प वेल्स उभारण्याबाबतही चर्चा झाली होती. त्यानुसार संरक्षण विभागाने विनामोबदला साडेसहा एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या जागेत एसटीपी आणि संबंधित प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

प्रकल्पासाठी सीएमई-पीसीएमसीची संयुक्त समिती

जागा उपलब्धतेनंतर आता महापालिका आणि सीएमईच्या माध्यमातून एसटीपी आणि संबंधित प्रकल्पाच्या देखरेखीकरता संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल. सल्लागार कंपनीची नियुक्ती करुन खर्च आणि कालावधी निर्धारित करण्यात येईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल. सांडपाणी एसटीपीपर्यंत वाहून नेण्यासाठी लागणारी लाईन टाकण्याची जबाबदारी महापालिकेची राहणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी नंतर नाल्यात सोडले जाईल किंवा महापालिका त्याचा विनियोग करेल. साडेसहा एकरमध्ये एसटीपी, 2 हजार चौरस फुटाच्या 4 प्लॉटमध्ये पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

भोसरी आणि दिघी (Dighi) परिसरातून निर्माण होणारे सांडपाणी नाल्यांद्वारे सीएमई हद्दीतून पुढे जात होते. त्यामुळे सीएमई हद्दीतच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारावा अशी मागणी मी 2021 मध्ये तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात या प्रस्तावाला खोडा घालण्यात आला.

शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, जलनि:सारण विभागाचे तत्कालीन सह शहर अभियंता रामदास तांबे यांच्या सहकार्याने सीएमईमध्ये एसटीपी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. आगामी दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्पाचे काम लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी अपेक्षा असल्याचे आमदार महेश लांडगे म्हणाले.

https://youtu.be/XGtgKVpZ00U

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.