Pimpri : मातंग समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – सुधीर मुनगंटीवार

एमपीसी न्यूज – आजपर्यंत मातंग समाज हा इतरांच्या सुख-दुखात सहभागी होत आला आहे. पण यापुढे इतर समाजाने देखील त्यांच्या सुख-दुखात सहभागी झाले पाहिजे. राज्य सरकार मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असून मातंग समाजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

राज्यातील मातंग समाजाच्या विविध प्रश्नासबंधी मुंबईत सह्याद्री अतिथी गृहात अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यावेळी ते  बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष व सचिव मधुकर कांबळे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे सदस्य अमित गोरखे, प्रा. डॉ. राम कांबळे, अॅड.सुरेंद्र घोडजकर, प्रा.पंडित सुर्यवंशी, प्रा. डॉ. चागंदेव कांबळे, प्रा. सुभाष वायदंडे, प्रा. सागर रधंवे, स्वप्निल भिंगारदिवे, संदिप ठोबंरे, नितीन दिनकर, प्रा.डॉ.शिवाजी जवळगेकर, पुजा देडे, वैशाली थोरात उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले,  स्वातंत्र्योत्तर काळापासून मातंग समाज समाजाच्या मुख्यप्रवाहात आलेला नाही. त्यामुळे हा समाज वंचित आणि शोषीत आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने विविध विभागाच्या सचिवांसह बैठक आयोजित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. आपणास राजकारणातील खुर्चीपेक्षा मातंग समाजाच्या मनातील खुर्ची हवी आहे, असेही ते म्हणाले.  मधुकर कांबळे, अमित गोरखे यांनी मातंग समाजाचे प्रश्न आणि अडचणी मांडल्या.

बैठकीत क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची पुनर्रचना करून नव्या स्वरूपात सुरु करणे याविषयी उपाययोजना आणि त्यांचे मुंबई येथे आंतर राष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण करणे, अनुसूचित जातीच्या बंद पडलेल्या, कालबाह्य झालेल्या विविध योजना नव्या स्वरूपात पुनर्रचना करणे, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेचे नाव बदलणे, अनुसूचित जातींसाठी असलेल्या विविध योजना, सवलती व इतर विकासाच्या योजनांचा लाभ अनुसूचित जातीमधील सर्वच जाती पोट-जातींना योग्य प्रमाणात मिळावा यासाठी कृतीशील उपाय योजना करणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.