Chinchwad : आरडे प्रकरणी धर्मादाय आयुक्तांशी बोलणं झालंच नाही – रेखा दुबे

एमपीसी न्यूज – दशरथ आरडे प्रकरणी धर्मादाय आयुक्तांशी बोलणं झालंच नाही. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी सांगून देखील दशरथ आरडे यांना बिलामध्ये सूट दिली नाही, ही केवळ अफवा असून संजय आरडे यांनी चुकीच्या पद्धतीने फिर्याद दिली आहे, अशी माहिती चिंचवड येथील आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा दुबे यांनी दिली.

आदित्य बिर्ला रुग्णालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दुबे बोलत होत्या. दुबे म्हणाल्या की, “दशरथ आरडे यांना 8 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज होती. त्यानुसार त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्याऐवजी सेमी आयसीयूमध्ये ठेवले तरी चालण्यासारखे असल्याने त्यांना सेमी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या आवश्यक तपासण्या करण्यात आल्या.

ही संपूर्ण प्रक्रिया करत असताना रुग्णालय प्रशासनाने वेळोवेळी दशरथ यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. दोन ते तीन दिवसानंतर त्यांच्या घरच्यांशी संपर्क झाला. त्यानंतर दशरथ यांच्या मुलाने एका सामाजिक कार्यकर्त्याला घेऊन येऊन रुग्णालय परिसरातून दशरथ यांना घेऊन गेले. दशरथ हे दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) नागरिक नाहीत. त्यामुळे त्यांचा उपचार बीपीएल अंतर्गत होऊ शकत नाही. तरीही त्यांनी त्याअंतर्गत उपचार करण्याची मागणी केली. तसेच दशरथ आरडे या रुग्णाला बीलासाठी डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. यावरून पोलीस तक्रारही दाखल झाली होती. सामाजिक संघटनांनी बिर्ला रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. याप्रकरणी डॉ. रेखा दुबे यांनी रुग्णालय प्रशासनाची बाजू मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.