Maval : डबल ग्रॅज्युएट, वकील, आदर्श सरपंच आता मावळ विधानसभेच्या रिंगणात!

एमपीसी न्यूज – शेतकरी कुटुंबातील डबल ग्रॅज्युएट तरुण ‘आदर्श सरपंच’ म्हणून स्वतःचा ठसा उमटवतो आणि स्वकर्तृत्वावर राजकारणात वेगळे स्थान निर्माण करतो. आता हाच तरुण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून मतदारराजाकडे कौल मागत आहे. या लक्षवेधी तरुण उमेदवाराचे नाव आहे अॅड. खंडुजी बाळाजी तिकोणे! 

काँग्रेस आघाडीचे बंडखोर उमेदवार अॅड. खंडुजी तिकोणे यांचा जीवनप्रवास अत्यंत नेत्रदीपक तेवढाच संघर्षमयही आहे. पवनानगर जवळ असलेल्या महागाव येथील तिकोणे या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तिकोणे हे डबल ग्रॅज्युएट आहेत. वाणिज्य व कायदा शाखेचे ते पदवीधर आहेत. शेतकरी कुटुंबातील जन्म झाल्याने व तळेगांव, पिंपरी चिंचवड, पुणे येथे शिक्षण झाल्याने त्यांना ग्रामीण व शहरी भागातील समस्यांची चांगली जाणीव आहे.

महाविद्यालयीन जीवनापासून राजकारण व समाजकारणाशी त्यांचा संबध आला. तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयातील निवडणुकीत ते वर्ग प्रतिनिधी व स्पोर्ट्स सेक्रेटरी म्हणून निवडून आले होते.

सन १९८९ मध्ये ते महागांवचे सरपंच झाले. तीन वेळा ग्रामपंचायतीत निवडून येण्याची संधी त्यांना मिळाली. ग्रामपंचायतीत केलेल्या कामामुळे तिकोणे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला. मावळ तालुका सरपंच संघाचा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव यांसारख्या मोहिमा व उपक्रम राबवून त्यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.

अॅड. खंडुजी तिकोणे यांनी १९९७ पासून युवक काँग्रेस चळवळीत काम सुरु केले. मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचा प्रांतिक प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य लिगल सेलचा समन्वयक, मावळ तालुका काँग्रेसचा कार्याध्यक्ष इत्यादी पदे त्यांनी भूषविली आहेत. कुटुंबात कोणताही राजकिय वारसा व पाठबळ नसताना तिकोणे यांनी स्वकर्तृत्वावर ही राजकीय भरारी मारली आहे.

सहकाराचे राजकारणातील महत्त्व ओळखून तिकोणे यांनी २००४ मध्ये जी.डी.सी. अन्ड ए. ही सहकारातील
पदविका मिळविली. सह्याद्री ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्था, बाळाजी पाणी वापर सहकारी संस्था, संजीवनी औद्योगिक सहकारी संस्था, सिद्धीविनायक कृषी पर्यटन सहकारी संस्था इत्यादी संस्थांची स्थापना करुन त्यांनी कृषी-पर्यटन व्यवसायातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. पवना कृषक सहकारी संस्थेचा चेअरमन, महागांव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन म्हणूनही तिकोणे यांनी काम केले आहे.

काँग्रेस आघाडीचे बंडखोर ‘अपक्ष’ उमेदवार म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले असून ‘कपबशी’ हे निवडणूक चिन्ह त्यांना मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.