EDLI Relief News : EDLI विमा योजनेची आर्थिक मर्यादा 6 लाखांवरुन 7 लाखांपर्यंत वाढवली

एमपीसी न्यूज – कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारा, कर्मचारी जमा सहबद्ध विमा योजनेची (EDLI) आर्थिक कमाल मर्यादा 6 लाखांवरून 7 लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे भविष्य निधी कार्यालयाद्वारे हा निर्णय घेण्यात आला. या योजनेनुसार याचा लाभ सध्या नोकरीवर कार्यरत असणा-या सभासदांना मिळेल.

कोरोना काळात मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारा दिलासा देण्यात आला आहे. संघटनेने विमा लाभाची रक्कम लाखांवरून 7 लाखांपर्यंत वाढविली आहे. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने आर्थिक मर्यादा वाढविण्यात आली आहे‌. तसेच, किमान रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अमिताभ प्रकाश यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या आधीन असलेल्या श्रम आणि रोजगार मंत्रालय, कर्मचारी भविष्य निधी कार्यालयातर्फे या योजनेचे काम चालते. दिल्लीच्या मुख्य कार्यालयामार्फत हा आदेश जारी करण्यात आला आहे.

ज्यामध्ये कर्मचारी भविष्य सहबध्द विमा योजनेची कमाल मर्यादा सहा लाख वरुन सात लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ सभासदांना कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्याद्वारे वारस म्हणून नोंद करण्यात आलेल्या कुटूंबातील सदस्यांना देण्यात येते. हि योजना 15 फेब्रुवारी 2020 पासून लागू करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.