Pimpri News: ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेतील सहभागी कर्मचा-यांना मिळणार 150 रुपये भत्ता

Employees participating in the 'Maze Kutumb, Mazi Jababdari' campaign will get an allowance of Rs 150.

एमपीसी न्यूज – शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात कोविड प्रादुर्भावावर नियंत्रण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम शहरात राबविण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या महापालिका कर्मचा-यांना मोहिम कालावधीत प्रतिदिन 150 रुपये भत्ता देण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली. या विषयासह विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे 5 कोटी 54 लाख रुपये खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची पहिली फेरी 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात आली. तर, दुसरी फेरी 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी महापालिका कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. घरोघरी भेटी देवून आरोग्य शिक्षण, महत्वाचे आरोग्य संदेश, संशयीत कोविड रुग्ण शोधणे तसेच मधुमेह, हदयविकार, किडनी आजार, लठ्ठपणा यासारख्या महत्वाच्या व्यक्ती शोधून काढणे, त्याचप्रमाणे बालकांचे लसीकरण आणि गरोदर मातांवर वेळीच उपचार करणे याबाबींचा मोहिमेत अंतर्भाव आहे.

या मोहिमेच्या अंमलबजावणी करीता महापालिका कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना मोहिम कालावधीत प्रति दिन 150 रुपये भत्ता देण्यात येणार आहे यासाठीच्या खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र.2 मध्ये विविध स्थापत्य विषयक कामे करणेसाठी 25 लाख 89 हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.