Pimpri: शिक्षण समिती सभापतींच्या दिमतीला पाच लाखाची नवी कोरी मोटार!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण  समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे यांच्या दिमतीला नवी कोरी मोटार येणार आहे. त्यांच्यासाठी पाच लाख 58 हजार 642 रुपये किमतीची टाटा झिस्ट  मोटार खरेदी करण्यात येणार आहे. या मोटार खरेदीला स्थायी समितीने आज (बुधवारी)आयत्यावेळी मंजुरी दिली.

महापालिकेच्या पदाधिका-यांना व अधिका-यांना कार्यालयीन कामकाजासाठी पालिकेतर्फे वाहन देण्यात येते. महापालिकेतील शिक्षण मंडळ बरखास्त होऊन त्याऐवजी 22 जून 2018 रोजी पालिकेत शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली. तर, नऊ जुलै रोजी सभापतींची निवडणूक झाली. भाजपच्या सोनाली गव्हाणे यांची पहिल्या सभापती म्हणून निवड झाली. त्यानंतर प्रत्यक्षपणे समितीच्या कामकाजाला सुरुवात झाली. त्यामुळे शिक्षण समितीत नवा गडी, नवे राज्य आले आहे.

सभापती गव्हाणे यांच्या वापरात अॅम्बेसिडर मोटार होती. मोटारीचे आयुष्यमान 14 वर्ष आठ महिने इतके झाले आहे. मोटार दोन लाख 40 हजार 715 किलोमीटर धावली आहे. आता सभापती गव्हाणे यांच्यासाठी पाच लाख 58 हजार 642 रुपये किमतीचे नवीन टाटा झिस्ट मोटार खरेदी करण्यात येणार आहे. या मोटार खरेदीला स्थायी समितीने आयत्यावेळी मंजुरी दिली.

दरम्यान, ‘फ’  क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसाठी देखील नवीन मोटार खरेदी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठीही पाच लाख 58 हजार 642 रुपये किमतीची टाटा झिस्ट एक्स्टा मोटार खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या खर्चालाही स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.