Pimpri News: संत निरंकारी मिशनतर्फे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचा डबा

गरजूंना मोफत अन्नधान्य राशन किटचे वाटप

एमपीसी न्यूज – कोविड रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्थित सोय करण्यात येते. परंतु रुग्णाला लागणारा प्लाझ्मा शोधून तो त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी खरी फरफट होते ती रुग्णांच्या नातेवाईकांची . ही समस्या लक्षात घेऊन  संत निरंकारी मिशनच्या पुणे झोन, भोसरी सेक्टरच्या माध्यमातून रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचा डबा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वायसीएम रुग्णालय रक्तपेढी, संजीवनी रक्तपेढी, पीएसआय रक्तपेढी, रेड प्लस रक्तपेढी, लाइफ लाईन रुग्णालय, देसाई रुग्णालय, कामठे रुग्णालय ,रोडे रुग्णालय येथे संत निरंकारी मिशनद्वारा रोज 80 ते 100 जेवणाचे डब्बे रुग्णांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचवले जातात. दोन महिन्यांपासून ही सेवा अविरत चालू आहे.

संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून भोसरी परिसरातील 50 हुन अधिक कुटुंबाना अन्नधान्य राशन किटचे वाटप करण्यात आले आहे. या किट मध्ये गहू, तांदूळ, डाळ, तेल, साखर, शेंगदाणा, मीठ, मसाले असे दैनंदिन जीवनात लागणारे राशन होते.   संत निरंकारी मिशन पुणे झोनचे प्रमुख ताराचंद करमचंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली, हे मानवतेचे कार्य असेच निरंतर चालू राहील, अशी माहिती भोसरी सेक्टर प्रमुख अंगद जाधव यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.