Pune News : ‘गदिमां’चे स्मारक सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल : महापौर मुरलीधर मोहोळ

गदिमां'च्या स्मारकाचे भूमिपूजन; माडगूळकर कुटुंबीयही उपस्थित

एमपीसीन्यूज : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा यांचे स्मारक पुणे महानगरपालिकेच्या वतीने साकारताना मनाला समाधान होत असून ‘समग्र’ गदिमा असणारे हे स्मारक सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोथरुडमधील महात्मा सोसायटी येथे साकारत असलेल्या स्मारकाचे भूमिपूजन महापौर मोहोळ आणि माडगूळकर कुटुंबियांच्या हस्ते करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने हा समारंभात पार पडला. कोरोनाचे संकट कमी झाल्यावर हा मुख्य कार्यक्रम विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

याप्रसंगी सुमित्र माडगूळकर, प्राजक्ता माडगूळकर यांच्यासह नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, किरण दगडे पाटील, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, अल्पना वरपे, गणेश वरपे उपस्थित होते.

महापौर मोहोळ म्हणाले की, ‘गदिमा आणि पुणेकर हे एक अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आत्मीयतेचे नाते होते. त्यांचे स्मारक पुण्यामध्ये असावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी त्यांचे चाहते, प्रेमी आणि कुटुंबांचीही होती. गेली दोन वर्षे स्मारक कोठे असावे?, त्याचे काम कसे असावे?, त्यात नेमके काय असावे? याची तयारी पुणे महानगरपालिकेकडून सुरू होती.

_MPC_DIR_MPU_II

कोथरूडमध्ये महात्मा सोसायटी येथे महापालिकेतर्फे बांधण्यात येणाऱ्या ‘एक्झिबिशन सेंटर’ या साडे सहा एकर जागेमध्ये अनेक प्रकल्प होत आहेत. त्याठिकाणी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर गदिमा स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे.’

‘गदिमा स्मारकामध्ये त्यांचा जीवनप्रवास आणि साहित्याची समग्र माहिती देणारे दालन, गदिमांनी वापरलेल्या वस्तूंचे दालन, डिजिटल दालन, सभागृह आणि व्यवस्थापन कक्ष अशी पाच दालने करण्यात येणार आहेत. गदिमांच्या स्मारकाचे क्षेत्रफळ हे ३७९८ चौ.मी. एवढे असणार आहे. गदिमांच्या स्मृती जतन व्हाव्यात आणि साहित्य पुढील पिढीला आठवण कायम रहावी, म्हणून गदिमांचे स्मारक हे निश्चितपणे सगळ्यांना प्रेरणा देणारे आणि कलाकारांना अभिमान असणारे आदर्श स्मारक उभे राहिल,’ असे महापौर मोहोळ म्हणाले.

महापौर मोहोळ म्हणाले की,’ पुणे महापालिकेने गदिमाच्या स्मारकासाठी चांगल्या प्रकाराची जागा उपलब्ध करून देणे, निधीची उपलब्धता करून देणे, सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पूर्ण करणे हे सगळे कामे पूर्ण केली आहेत.

गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षनिमित्ताने पुणेकरांच्या वतीने ही एक आदरांजली होईल, त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी एक अद्यावत दालन स्मारक पुण्यामधे उभारत आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात साडे आठ कोटी रुपयांच्या आर्थिक निधीला मान्यता मिळाली आहे. आज स्मारकाचे भूमिपूजन पार पडले, स्मारकाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे, याचा मला आनंद आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.