Maval : तिकोणा गडावर दुर्गसंवर्धनाचा श्री गणेशा; गडावर उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पा विराजमान

Ganpati idol installed on Tikona fort by Durgsanwardhan.

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील किल्ले तिकोणा गडावर दुर्गसंवर्धनाचा श्री गणेशा झाला आहे. उत्साहपूर्ण वातावरणात गणपती बाप्पा गडावर विराजमान झाले आहेत. गडावरील गणेशोत्सवाचे यंदा तिसरे वर्ष आहे. गडावर गणराय तळजाई माता लेणीत विराजमान करण्यात आले आहे. 

गणरायाच्या आगमनाने शिवरायांच्या काळातील ऐश्वर्य आणि वैभव गडास प्राप्त व्हावी, महाराष्ट्रातील सर्व गडदुर्गावर चांगले दिवस यावेत आणि पुन्हा एकदा त्याच रुपात उभे राहून इतिहास जगासमोर यावा यासाठी किल्ले तिकोणा गडावर दुर्गसंवर्धनाचा श्री गणेशा उत्सव साजरा करण्यात येत आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पर्यावरण पूरक शाडूच्या मातीचा आहे. हा गणराया कामशेत येथील थोरात सर यांनी स्वत: तयार केला आहे. पायथ्यापासून गणपती बाप्पाचा गजर करत मावळ्यांनी पालखीतून बाप्पाला गडावर आणण्यात आले.

रिमझिम पाऊस, त्यात हलके धुके, सर्वत्र हिरवळीने नटलेल्या परिसरात गणेशाची पालखी देवडी, वेताळ दरवाजा, वेताळला फुलं वाहून पालखी गडावरील चपटेदान मारुतीची पूजा करून लेणीमध्ये पोहोचली.

गणरायाच्या स्वागतासाठी मांडव, रांगोळी, आब्दगीरी, झेंडे होते. विधीवत गणराय गडावर विराजमान झाले. गडावरच्या या दुर्गसंवर्धनाच्या श्री गणेशाची स्थापना ग्रामस्थ गडसेवक गुरुदास मोहोळ यांच्या हस्ते झाली गणेशाची आरती, पुजण झाले. अगरबत्ती, धुपाने मोहक वातावरण निर्माण झाले.

त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा सर्वांनी लाभ घेतला. मध्यंतरीच्या वादळाने गडावरच्या लाईट बंद असल्याने जनरेटर उपलब्ध करून दिल्याबद्दल अमोल पगडे व विनायक पडवळ यांचे आभार मानन्यात आले.

यावेळी गडावर विश्वनाथ जावळीकर, शिवराज सरोदे, विनायक हिरे, अक्षय औताडे किरण चिमटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.