Harshad to act in new serial: आता लवकरच हर्षद झळकणार नवीन मालिकेत

या मालिकेचं शूटिंग करताना मला दुर्वा या मालिकेचे दिवस आठवतात कारण मालिकेचे दिग्दर्शक दीपक नलावडे यांच्यासोबत मी दुर्वामध्येही काम केलं होतं.

एमपीसी न्यूज – एखाद्या नव्या स्टारला एखाद्या वाहिनीवरील मालिकेमुळे रातोरात प्रसिद्धी मिळते. त्यामुळे त्याचा त्या वाहिनीबरोबरचा प्रवास नव्याने सुरु होतो. असाच अनुभव स्टार प्रवाह वाहिनीच्या दुर्वा मालिकेतून केशव या व्यक्तिरेखेद्वारे घराघरात पोहोचलेला अभिनेता हर्षद अतकरी याला आला आहे. आता हर्षद नव्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या नव्या मालिकेतून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीसोबतची हर्षदची ही दुसरी मालिका आहे.

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना हर्षद म्हणाला, ‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की बाप्पाच्या आशीर्वादाने गणेशोत्सवाच्या काळात माझ्या नव्या मालिकेचा श्रीगणेशा होतोय. स्टार प्रवाहच्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत मी शुभम ही व्यक्तिरेखा साकारतो आहे.

या मालिकेचं शूटिंग करताना मला दुर्वा या मालिकेचे दिवस आठवतात कारण मालिकेचे दिग्दर्शक दीपक नलावडे यांच्यासोबत मी दुर्वामध्येही काम केलं होतं. दिग्दर्शकांची तीच टीम या मालिकेतही आहे. केशव या पात्राच्या पूर्णपणे वेगळं पात्र मी ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत साकारतो आहे. अतिशय शांत आणि मवाळ असं हे पात्र आहे. त्यामुळे या मालिकेसाठी मी खूपच उत्सुक आहे’.

अशिक्षित नायक आणि सुशिक्षित नायिका यांच्यातील आणि पर्यायाने त्यांच्या कुटुंबातील संघर्ष अशी या मालिकेची कथा असल्याचे प्रसारित होणा-या प्रोमोंवरुन समजते आहे.

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका 2 सप्टेंबरपासून रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.