Talegaon : कर्करोगाशी झुंजत ‘त्याने’ तळेगावमध्ये फुलवली केशराची शेती

एमपीसी न्यूज – बी कॉम पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर गौतम राठोड यांनी तळेगाव येथेच गॅरेज सुरु केले. कष्टाला (Talegaon) नशिबाची जोड मिळत गेली आणि संसार बहरत गेला. पण सुखी संसाराला दृष्ट लागली आणि गौतम यांना कर्करोगाचे निदान झाले. त्यात त्यांना एक किडनी काढावी लागली. आजारपणामुळे त्यांना अवजड कामे होत नव्हती. त्यातही त्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने एरोफोनिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये त्यांना यश आले असून या अथक परिश्रमातून त्यांनी काश्मीर प्रमाणेच उत्तम दर्जाचे केशर तळेगाव दाभाडे येथे बनवणे शक्य असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.

गौतम यांना शेतीची सुरुवातीपासून आवड आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे हा त्यांच्या विशेष आवडीचा विषय आहे. काही वर्ष फलोत्पादन करत असताना त्यांनी अनेक लँडस्केपिंग प्रकल्प हाताळले. नंतर ते मेकॅनिकल क्षेत्रात वळले. तळेगाव दाभाडे येथे घराजवळच त्यांनी स्वतःचे गॅरेज सुरु केले.

तब्बल 20 वर्ष त्यांनी इमाने इतभारे गॅरेज चालवले. पण नियतीला हे मान्य नव्हते. दरम्यान, त्यांना कर्करोगाचे निदान झाले. उजव्या किडनीमध्ये कर्करोगाची गाठ वाढत होती. ती काढणे शक्य नसल्याने त्यांना गाठीसह किडनीच काढावी लागली.

आता प्रकृती चांगली असली तरी कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर गौतम यांना गॅरेज मधील अवजड काम होईना. त्यामुळे त्यांनी कामाचे क्षेत्र बदलण्याचा निर्णय घेतला. चांगले तंत्रज्ञान वापरून बागायती शेती करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. दरम्यान, त्यांच्या एका पाहुण्याने त्यांना केशर लागवडीचा व्हिडीओ पाठवला. या एका व्हिडीओने गौतम यांचे पुढचे निर्णय (Talegaon) बदलून गेले.

केशर लागवडीचा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांची केशर बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली. त्यांनी केशर विषयावर संशोधन केले. कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला, केशर लागवडीचे प्रशिक्षण घेतले आणि त्यातून छतावरील एका बंदिस्त प्लॉटमध्ये केशरची लागवड करण्याचे निश्चित झाले. त्यांनी त्यांच्या इमारतीच्या छतावर व्हर्टीकल फार्मिंगद्वारे सुमारे दीड एकर जमिनीच्या समतुल्य केशर लागवडीसाठी वातावरण तयार केले.

गौतम यांचे एप्रिल 2023 मध्ये केशर या विषयाची माहिती संकलित करण्याचे काम सुरु होते. त्याला इच्छाशक्तीचे बळ मिळाल्याने ऑगस्टमध्ये त्यांनी काश्मीर येथून केशरचे बियाणे आणले. त्याची लागवड झाली. केशरचे पिक एरोफोनिक पद्धतीने वाढू लागले. केवळ हवेच्या माध्यमातून पिकाला जे हवे ते दिले गेले आणि तीन महिन्यात व्हर्टीकल फार्मिंगमध्ये केशरच्या पिकाचे बेडच्या बेड तयार झाले.

Dapodi : दापोडी येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

तीन महिन्यांनी म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात त्यांचे केशर पिक काढणीला आले. त्यांनी दर्जेदार केशरची काढणी सुरु केली आहे. 12 ते 13 मिलीमीटर लांबीच्या केशरला सध्या 800 रुपये प्रती ग्रॅम एवढा भाव मिळत आहे. तर तुकडा केशर 400 रुपये प्रती ग्रॅम प्रमाणे विकले जाते. आता या दर्जेदार केशरच्या विक्रीसाठी परवाना काढून त्याला सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा मानस गौतम राठोड यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना व्यक्त केला.

केशर खरेदी आणि इतर चौकशीसाठी गौतम राठोड (9762949459) यांच्याशी संपर्क करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.