Pune : सर्पदंश उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी

डॉ. सदानंद राऊत; जागतिक सर्पदंश जनजागृती दिनानिमित्त मार्गदर्शन 

एमपीसी न्यूज – “बदलत्या पीक पदधतीमुळे शेतकरी, कामगार शेतात राहत आहेत. त्यातून मानुष्य आणि सापांचा संपर्क वाढला आहे. त्यामुळेच सर्पदंशाचे प्रमाणही वाढले आहे. सर्पदंश हा आता “सीझनल’ राहिला नसून, तो कधीही होऊ शकतो. त्यामुळे डॉक्‍टर आणि नागरिक यांनी सदैव सतर्क राहिले पाहिजे. विशेषत: ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सर्पदंशाच्या उपचारासाठी आवश्‍यक यंत्रणा ही अधिक सक्षम केली पाहिजे,” असे मत सर्पदंश उपचाराचे तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी व्यक्त केले.

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे 19 सप्टेंबर हा जागतिक सर्पदंश जनजागृती दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. यंदा पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात येत असून, पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग आणि विघ्नहर मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आरोग्य आधिकाऱ्यांसाठी सर्पदंश जनजागृतीविषयक कार्यशाळेचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. राऊत यांनी “सर्पदंश’ विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते, उपाध्याय विवेक वळसे पाटील, आरोग्य सभापती प्रवीण माने, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप माने, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी बोरा, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, दत्तात्रय झुरंगे, माजी आरोग्य सभापती रणजित शिवतारे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्पदंशाबाबत जनजागृतीविषयक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. राऊत म्हणाले, “सर्पदंशावर उपचार घेण्याबरोबरच त्याबाबत काळजी घेणे ही देखील तितकीच आवश्‍यक बाब आहे. अनेकदा गावांमध्ये स्वच्छता राखली जात नाही. सुरक्षेच्या बाबींकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून सर्पदंश होण्याचे प्रमाण वाढते. त्यातच सर्पदंश झाल्यावर वैद्यकीय उपचार देण्याऐवजी घरगुती उपचार अथवा तांत्रिकाकडे नेले जाते. यामुळे रूग्णाची परिस्थिती अजून खालावते. त्यामुळे अशाप्रकारचे उपचार न करता, रूग्णास त्वरित डॉकटरांकडे नेले पाहिजे. वेळेवर उपचार मिळाल्यास रूग्ण बचावण्याचे प्रमाण 100 टक्के असते.”

देवकाते म्हणाले, “जगात प्रथमच साजरा होणाऱ्या जागतिक सर्पदंश दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेला कार्यक्रम हा अतिशय चांगला उपक्रम आहे. यासाठी परिषदेच्या आरोग्य विभागाचे अभिनंदन. सर्पदंश हा अत्यंत गांभीर्याने घेण्याचा विषय आहे. यामुळे एकट्या जुन्नरमध्ये 1300 रूग्ण दगावले आहेत. परिषदेचा आरोग्य विभाग हा नेहमीच माणूसकीच्या दृष्टीकोनातून काम करतो. यापुढेदेखील अशाप्रकारच्या आजारांबाबत आवश्‍यक ती सर्व मदत विभाग आणि परिषदेतर्फे सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रांना उपलब्ध केली जाईल.”

विवेक वळसे पाटील म्हणाले, “आजही सर्पदंशांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी मण्यार आणि नाग यांच्या दंशाचे प्रमाण जास्त होते मात्र आज घोणस या अतंत्य विषारी सापाच्या दंशाचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी तातडीने वैद्यकीय मदत मिळणे आवश्‍यक असते. मात्र नागरिक सुरवातीचा बहुतांश वेळ घरगुती उपचारामध्येच घालवतात. याविषयात जनजीगृतीची आवश्‍यकता आहे.”

प्रवीण माने म्हणाले, “सर्पदंशविषयक काळजी ही काळाची गरज. धरण क्षेत्राच्या परिसरात ही समस्या जास्त. गेल्या वर्षी आरोग्य विभागाचा काम करताना ही समस्या जवळून जाणून घेता आली. यामध्ये लस नसल्याची समस्या जास्त होती सर्पदंशावरील लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळेच आज जिल्ह्यात लसींचा तुटवडा नाही. लस नसलेले एकही प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात नाही. या समस्येबाबत विभाग अतिशय जबाबदारीने काम करत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.