Pimpri : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत हीट ऍक्शन प्लॅन कार्यशाळा

एमपीसी न्यूज – तापमानवाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर (Pimpri) प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नागरी सहभाग महत्वाचा असून यासाठी महापालिका तयार करत असलेला पिंपरी चिंचवड शहराचा हीट ऍक्शन प्लॅन उपयुक्त ठरणार आहे, असे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर म्हणाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात ‘हीट ऍक्शन प्लॅन’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सह आयुक्त इंदलकर बोलत होते.

या कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, संजय कुलकर्णी, उप आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बंसल, डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्रा. डॉ. प्राजक्ता कुलकर्णी, पुणे नॉलेज क्लस्टरच्या कार्यक्रम व्यवस्थापक अश्विनी केसकर, सुर्या फर्निटेकचे संचालक विश्वास दिक्षीत, व्रिंदा दिक्षीत, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिंदे, निलेश करकरे, सामाजिक कार्यकर्त्या विद्या कुंभार यांच्यासह आरोग्य, वैद्यकीय, पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, नगररचना, स्थापत्य, पाणीपुरवठा आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रा. डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या, जगातील अनेक देशांसह भारतानेही वाढते वातावरणातील तापमान हा विषय गांभिर्याने घेतला आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्युंचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून दरवर्षी जागतिक तापमानातही वाढ होताना दिसत आहे. या सर्व बाबींचा दैनंदिन कामकाज करत असताना अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम (Pimpri) होत आहे.

तापमान बदल व वाढत्या उष्णतेबाबत पुरेशी काळजी आणि उपाययोजना केल्या नाही तर उद्भवणार्‍या समस्यांचा प्रत्येक घटकाला सामना करावा लागू शकतो. उन्हाळ्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसारासारखे पचनक्रियेशी संबंधित आजार आणि उष्माघात या आजारांचा समावेश असतो. याशिवाय त्वचेसंदर्भात समस्या देखील उद्भवू शकतात. वातावरणातील कमाल तापमानात 4 डिग्री ते 5 डिग्रीपेक्षा अधिक वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जाते, असे त्या म्हणाल्या.

रात्रीच्या वेळी अनेक शहरांचे तापमान जास्त असते असे शहरी तापमानाबाबत केलेल्या अभ्यासात निदर्शनास आले आहे. त्यामध्ये भारतातील 44 शहरांचा समावेश आहे, यात ग्रामीण भागांचाही समावेश आहे. शहरातील विविध भागांमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असले तरी रात्रीच्या वेळी तापमान कमी होण्यास अधिक वेळ लागत असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी प्रशासकीय आणि शहरी नियोजन करणे गरजेचे असून सार्वजनिक पायाभूत सुविधा, जनजागृती, क्षमता निर्माण आणि तापमानाचा सर्वात जास्त परिणाम होणारे समुदाय ओळखून योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे प्रा. डॉ. कुलकर्णी यावेळी म्हणाल्या.

शहरी तापमान आटोक्यात आणण्यासाठी किंवा तापमानाच्या लाटेचा सामना करण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपायांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. यामध्ये उड्डाणपुलांच्या खाली विसावा घेण्यासाठी जागा निर्माण करणे, रहदारीच्या ठिकाणी पाण्याची फवारणी करणे, शहरातील उद्यानांच्या वेळेत बदल करणे, दुपारी 12 ते 3 दरम्यान काही भागातील वाहतूक सिग्नल बंद करणे, बांधकामांच्या ठिकाणी किंवा घराबाहेर काम करणाऱ्या कामगारांच्या वेळेत बदल करणे, पोलिस स्टेशन, दवाखाने तसेच रुग्णालयांमध्ये उष्णता आपत्कालीन प्रतिसाद पथके स्थापन करणे अशा विविध अल्पकालीन उपायांचा समावेश होता. शहराच्या नागरी क्षेत्राच्या अभ्यासात्मक विश्लेषणानंतर दीर्घकालीन उपायांची मांडणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.