Hinjawadi Crime : वाहतूक कार्यालयात सहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण

एमपीसी न्यूज – वाहतूक कार्यालयात मोठमोठ्याने आरडाओरडा करत सहाय्यक पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की आणि मारहाण केली. हा प्रकार गुरुवारी (दि. 24) सकाळी पावणे बारा वाजता हिंजवडी वाहतूक कार्यालयात घडला आहे. पोलिसांनी प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

संतोष शंकर मंजुळकर (वय 41, रा. पाषाणगाव), उदराम डगलाराम घाची (वय 38, रा. बालेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे हे हिंजवडी वाहतूक कार्यालयात कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी कर्तव्यावर असताना त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका खाजगी कारवर (एम एच 14 / सी एस 1554) कारवाई केली.

या कारवाईवर आक्षेप घेत आरोपी हिंजवडी वाहतूक कार्यालयात आले. त्यांनी वाहतूक कार्यालयात मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली.

आरोपींनी सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे यांना जमिनीवर पाडून शिवीगाळ करत धमकी दिली. लोंढे करीत असलेल्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.