Hinjawadi : जमिनीच्या वादातून सख्या भावाला सायकलच्या चेनने मारहाण

एमपीसी न्यूज – वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाला सायकलच्या चेनने मारहाण केली. यामध्ये लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना मुळशी तालुक्यातील पारखीवस्ती, माण येथे गुरुवारी (दि. 11) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

अनिता दिलीप पारखी (वय 35, रा. पारखीवस्ती, अपंग शाळेजवळ, माण, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राजेंद्र लक्ष्मण पारखी (वय 43, रा. पारखीवस्ती, अपंग शाळेजवळ, माण, ता. मुळशी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप लक्ष्मण पारखी असे जखमी इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारखी यांची माण येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या वाटण्यावरून दिलीप आणि राजेंद्र या दोघा सख्या भावांमध्ये वारंवार भांडण होत होते. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास अनिता आणि दिलीप हे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत घरासमोर बोलत थांबले होते. त्यावेळी दिलीप यांचे थोरले बंधू राजेंद्र तिथे आले आणि त्यांनी सायकलच्या चेनने दिलीप यांना मारहाण केली. यामध्ये दिलीप यांच्या डोक्यात, कानावर आणि चेह-यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावरून दिलीप यांच्या पत्नी अनिता यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामने तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.