Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायचंच असेल तर सर्वसामान्यांच्या मनात व्हावं – डॉ अरुणा ढेरे 

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि त्यांनी काय करुन ठेवलं हे सर्वसामान्य नागरिकांनी समजून घेणं अधिक गरजेचं आहे. सर्वसामान्य माणसांनी त्यांचा मोठेपणा अनेक अंगांनी उलगडून घेण्याची अधिक गरज आहे. उद्याच्या महाराष्ट्रासाठी त्यांनी जे काही संचित देऊन ठेवलयं, ते समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक व्हायचंच असेल तर ते सर्वसामान्य माणसांच्या मनात व्हायला पाहिजे, अशी भूमिका 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मांडली.

जानेवारी महिण्यात यवतमाळमध्ये होणा-या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.अरुणा ढेरे यांची निवड झाली आहे. दरवर्षी निवडणूक प्रक्रियेतून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड केली जात होती. यामध्ये हजारापेक्षा अधिक मतदार मतदान करतात. यावर्षी मात्र निवडणूक न घेता सर्वांच्या सहमतीने अध्यक्षाची निवड व्हावी, अशी भुमिका साहित्य महामंडळ आणि इतर घटकांनी घेतली होती. त्यानुसार लेखिका अरुणा ढोरे यांची यावर्षी प्रथमच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, हा मुद्दा आता मराठी माणसांपुरता राहीला नाही, हा मुद्दा आता शासनाच्या निर्णयाशी जोडला गेला आहे. त्यामुळे मराठीचा दर्जा हा अभिजात आहे, हे आपण सिध्दही केलं आहे. मराठीच्या प्राचिनत्वाचे पुरावेही आपल्याकडे आहेत आणि आपण ते सरकारदरबारी सिध्दही केले आहेत. पण त्यावर मोहोर उमटवणं हे काही आपल्या हातात नाही. त्यामुळे वाट बघण्याखेरीज  आपण काहीच करु शकत नाही. अशी खंत देखील डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.