Smart City: गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन; राष्ट्रवादीचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील केबल इंटरनेट (Smart City) जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा निर्णय स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने दोन दिवसांत मागे घ्यावा. अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिला.

देशभक्तीचे ढोंग करणारे भाजपचे नेते दुसरीकडे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्या लोकांकडे शहर सोपविणार असल्याने पिंपरी-चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच या कपंनीशी संबंधीत आजी-माजी संचालक हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असून झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये ते गुंतलेले आहेत, असेही गव्हाणे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व गुन्ह्यांचा आम्ही पर्दाफाश करणार आहोत, असेही गव्हाणे यांनी सांगितले. शहरातील जनतेनेही या विषयावर रस्त्यावर उतरावे आणि आपले शहर या गुन्हेगारांपासून वाचवावे असे आवाहनही त्यांनी केले.

स्मार्ट सिटी समिती व्यवस्थापनाने शुक्रवारच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध डावलून या विषयावर निर्णय घेतला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला आयुक्त शेखर सिंह यांना भेटले असता, चौकशी करून पुढील निर्णय करू, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात बैठकित त्यावर शिक्कामोर्तब केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. आयुक्त शेखर सिंह यांना सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि संबंधीत कंपनीचे सर्वेसर्वा कशाप्रकारे पाकिस्तान आणि दुबईमध्ये गुन्हेगारी टोळीशी संपर्कात आहेत ते पुराव्यासह (Smart City) दाखवून दिले. त्यानंतरही एका बड्या नेत्यांच्या दबावाखाली तो विषय मंजूर केल्याने नागरिकांमध्येही संतप्त प्रतिक्रिया आहे.

PMC : पुणे महापालिका व धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे 37 स्मशान भूमी आणि 12 कब्रिस्तानची भुमीची स्वच्छता; 211 टन कचरा संकलन 

अजित गव्हाणे यांनी म्हटले आहे की, मे. सुयोग टेलिमॅटिक्स लिमिटेड – मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या भागीदार कंपनीने निविदा भरली आहे. त्यातील मे. फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि.मध्ये संचालक असलेले रियाझ अब्लूज अजिज शेख, संजय सिन्हा, ड्वेन मायकेल परेरा हे संचालक होते. रियाझ शेख आणि ड्वेन परेरा यांच्यावर अहमदाबाद येथे बनावट टेलिफोन एक्सचेंज चालविण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. यांच्याकडेच शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविण्यात येणार आहे. शहरातील एक बडा नेता आणि महापालिका प्रशासनाचाही त्यासाठी बराच आग्रह असल्याने संशय बळावला आहे. अशा प्रकारे गुन्हेगारांच्या हातात शहरातील अंडरग्राऊंड केबल नेटवर्क सोपविले तर आगामी काळात खूप मोठा धोका संभवतो.

शहराला नेमका धोका असा आहे –

केबल इंटरनेटचे नेटवर्क अशा गुन्हेगारांकडे गेले तर, उद्या डेटा चोरी होऊ शकते. दुबई किंवा पाकिस्तानातून खंडणी उकळण्यासाठी गुन्हेगारांनी फोन केला तरी ते सापडणार नाही. महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जातीय तेढ निर्माण करण्यासाठीही ही यंत्रणा वापरली जाऊ शकते इतकेच नाही तर अतिरेकी कारवायासुद्धा होऊ शकतात. शहरच नव्हे तर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, असेही गव्हाणे (Smart City) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.