IND v/s ENG Cricket 1st Test Match: लॉर्ड्सवरील भारताची इंग्लंडवरील मात अविस्मरणीय

एमपीसी न्यूज (विवेक कुलकर्णी) – कसोटी क्रिकेटचा रोमांच काय असतो, ते पुन्हा एकदा असंख्य भारतीय रसिकांइतकाच जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांना लॉर्ड्स वरील भारत आणि इंग्लंड यांच्यामधील दुसऱ्या कसोटीच्या दरम्यान अनुभवता आला.

एखाद्या पट्टीच्या राजकारणी माणसाने आपल्या भूमिका टोपीसम फिरवाव्यात तसे खेळपट्टीने विविध रंग उधळले, दोलायमान परिस्थिती, कोणीही जिंकेल, सामना अनिर्णित होईल, अशा सर्व शक्यता वारंवार डोळ्यापुढे येत होत्या, पण अंततः भारतीय संघाने सरस खेळ करत बाजी मारली आणि कोहलीच्या टोळीने ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर भारतीय तिरंगा 75 व्या स्वतंत्रदिनाच्या दुसऱ्या दिवशी सन्मानाने फडकवला.

आजतागायतचा सर्वोत्तम जलदगती गोलंदाजाचा ताफा असलेल्या भारतीय संघाने त्या बिरुदावलीला जागत 20 च्या 20 बळी घेत आपल्याला लौकिकाला न्याय दिला. परवापर्यंत कोहली, रोहित आणि राहुल बाद झाल्यानंतर सामना वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या भारतीय संघाने प्रथम पुजारा आणि रहाणे यांच्या शतकी भागीदारीनंतर, तळाच्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला बॅकफूटवर ढकलले.

त्यातच सद्गृहस्थांचा खेळ, अशी टिमकी मिरवणाऱ्या साहेबांनी उगाचच जलदगती असूनही खराखुरा सद्गृहस्थ म्हणवल्या जाणाऱ्या बुमराहला हकनाक डिवचले, त्यामुळे पेटून उठलेल्या बुमराह आणि शमीने आठव्या विकेटसाठीची विक्रमी भागीदारी नोंदवून भारत या सामन्यात किमान हरणार तरी नक्की नाही अशी भक्कम पायाभरणी केली. त्यातच कोहलीने डाव घोषित करुन रूट आणि कंपनीला मानसिकरित्या पुन्हा बॅकफूटवर ढकलले.

पहिल्या डावात खास कामगिरी न करू शकलेल्या बुमराहने मात्र ही कसर दुसऱ्या डावात भरून काढली  आणि बर्न्ससह कर्णधार रूट जो या दौऱ्यात तुफान फॉर्मात आहे त्याला बाद करत इंग्लंड संघाची अवस्था बिकट केली.

दुसऱ्या बाजूने इशांत शर्माने दोन बळी घेत दुसरा मोठा घाव घातला. बटलर आणि मोईन अली यांनी मात्र बऱ्यापैकी तग धरून किमान सामना अनिर्णित होईल, अशी फलंदाजी चालू ठेवली होती. त्यातच कोहलीने एक झेल सोडून तर जडेजाने नो बॉल टाकून (ज्यावर बटलर झेलबाद होता) इंग्लंड संघाला जणू एक जीवदानच दिले होते, पण नव्या दमाचा तडफदार गोलंदाज मोहम्मद सिराज मात्र आज काही तरी खास करून दाखवायचेच या जिद्दीने गोलंदाजी करत होता. त्याने एकाच षटकात मोईन अली आणि सॅम करनला लागोपाठ बाद करून भारतीय संघाला विजयाजवळ आणले.

यातून इंग्लिश संघ सावरला नाहीच. उरलेल्या औपचारिकतेला सिराजने पूर्ण करत पहिल्या डावाइतकेच चार गडी दुसऱ्या डावातही बाद करत जोरदार कामगिरी केली, तर शमीने फलंदाजीत सुद्धा चमक दाखवत अष्टपैलू कामगिरी केली. बुमराह, ईशान्त यांनी सुद्धा आपली कामगिरी चोख बजावली आणि संघाला तब्बल 151 धावांचा मोठा विजय मिळवून दिला.

एक वेळ भारत हा सामना हरणार असे वाटत होते, तर रूट आणि बटलर खेळत असताना इंग्लिश संघ किमान अनिर्णित तरी ठेवेल असे वाटत असताना भारतीय गोलंदाज मात्र ‘अनहोनी को होनी’ करण्याची जिद्द बाळगून तुफानी गोलंदाजी करत होते. त्याचेच फळ विराटला मिळाले. त्याने या विजयाच्या जोरावर चक्क सर लॉइड यांना मागे टाकले आहे. त्याच्यापुढे आता रिकी पॉंटिंगच कर्णधार म्हणून पुढे आहे.

पहिल्या डावातल्या शतकामुळे भारतीय संघाला स्थैर्य प्राप्त करून देणारा के. एल. राहुल हा सामनावीर ठरला असला तरी पुजारा, रहाणे, रोहित, शमीसह बुमराह, सिराज, इशांत अशा सर्वाचीच सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत 1- 0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.