Worldcup 2023 : दुबळ्या अफगाणिस्तानचा गत विजेत्या इंग्लंडवर 69 धावांनी दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – विश्वचषक स्पर्धा पुढे जात आहे तसा या स्पर्धेतला (Worldcup 2023)रोमांच व थरार अनुभवायला मिळतो आहे. आयसीसी रँकिंग मध्ये 9 व्या क्रमांकावर असलेल्या अफगाणिस्तानने गतविजेत्या बलाढ्य इंग्लंडला 69 धावांनी धूळ चारत दणदणीत विजय मिळविला आहे.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने अफगाणिस्तानला फलंदाजीचे निमंत्रण दिले. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर छोट्या सीमारेषा अणि फलंदाजीसाठी अनुकूल अशा परिस्थितीत अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी 114 धावांची दमदार सुरुवात दिली.

सलामीवीर गुरबाज याने 57 चेंडूत 80 धावांची धडाकेबाज फलंदाजी केली. त्याला इब्राहिम जादरान 28 धावांची संयमी साथ दिली.
1 बाद 114 धावा अशा भक्कम स्थितीत असणारा अफगाणिस्तान 6 बाद 190 धावा अशा बिकट परिस्थितीत पोहोचला.

तथापि, ईक्राम अलीखील याने एक बाजू सांभाळत 58 धावांचे (Worldcup 2023) योगदान देत अर्धशतकी खेळी केली. रशीद खान 23 धावा अणि मुजीब 28 धावा यांनी तळात ताबडतोब फलंदाजी करत संघाला 49.5 षटकांमध्ये 284 धावांचे आव्हान उभारून दिले.

यावेळी इंग्लंडच्या आदिल रशीदने 10 षटकांमध्ये 42 धावा देत तीन गडी बाद केले.

दिल्ली येथील मैदानाची स्थिती आणि इंग्लंडची फलंदाजी पाहता अफगाणिस्तानने दिलेले 285 धावांचे आव्हान इंग्लंड सहज पार करेल असे वाटत होते.

परंतु अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या फलंदाजांना व्यसन घातले. इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेरस्टो याला दुसऱ्याच षटकात फजलहक फारुखीने पायचीत केले.

तर जो रूटला मुजीबने त्रिफळाचित केले. सलामीवीर डेव्हिड मलान याने 32 धावांची खेळी केली, त्याला नबीने बाद केले. त्यानंतर आलेल्या हॅरी ब्रूक याने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, त्याने 61 चेंडू 66 धावांची अर्धशतकी खेळी केली.

Nashik : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह बस चालकावर गुन्हा दाखल; आरटीओ अधिकाऱ्यांचे निलंबन

त्याचा अडथळा मुजिबने दूर केला. इंग्लंडकडून कोणत्याही खेळाडूंनी मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्यांचा डाव 40. 5 षटकांत 215 धावांवर संपुष्टात आला.

यावेळी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत इंग्लंडचा पराभव केला. फिरकीपटू मुजीब उर रहमान त्याने 10 षटकांमध्ये 51 धावा देत 3 बळी मिळवले, तसेच राशीत खान यानेही 3 गडी बाद केले. मोहम्मद नबी याने 2 गडी टिपले, फारुकी आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

या गोलंदाजांच्या जोरावर अफगाणिस्तानने इंग्लंडला 69 धावांनी पराभूत केले. या स्पर्धेचा सामनावीर मुजीब उर रहमान ठरला.

या विजयाने अफगाणिस्तानचा आत्मविश्वास दुणावला असून विश्वचषकातील पॉईंट्स टेबलमध्ये अफगाणिस्तान सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

टेबल पॉईंट्स भारत अव्वल स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा क्रमांक दहावा आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.