Worldcup 2023: भारताचे स्वप्न भंगले ; वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विजयी

एमपीएससी न्यूज : (विवेक कुलकर्णी) ऑस्ट्रेलियन संघाने भारताचा(Worldcup 2023) दणदणीत पराभव करत जिंकले सहावे जेतेपद.

2023 मधल्या विश्वकप स्पर्धेचा नवा जेता कोण याचा फैसला होण्यासाठी झालेल्या विश्व कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज भारतीय संघांने 5 वेळा ही स्पर्धा जिंकलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघापुढे 241 धावांचे लक्ष्य ठेवले होते ज्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघाने अतिशय शानदार खेळ करत भारताला,भारतात लाखाहुन अधिक प्रेक्षकांसमोर शानदार खेळ करत 6 गडी राखून पराभूत करुन सहाव्यांदा विश्व कपावर आपले नाव कोरले आहे.

Chinchwad : कामगाराने केली साडेतीन लाखांची चोरी
संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष्य लागून राहिलेल्या क्रिकेटच्या(Worldcup 2023) महाकुंभाच्या जेतेपदाची लढत आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर लढली गेली,ज्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्याला अनुसरून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान भारताने आपल्या निर्धारित 50 षटकात आतापर्यंत केलेल्या जबरदस्त खेळाच्या विपरीत खेळ करत सर्व गडी गमावून 240धावा केल्या , मात्र त्या जेतेपद मिळवण्यासाठी पुरेशा
या गोलंदाज धार्जिन्या मैदानावर भारतीय संघाच्या तिसऱ्या जेतेपदासाठी पुरेशा ठरतील की ऑस्ट्रेलिया संघ आपला दबदबा कायम ठेवत विक्रमी सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकणार का याकडे समस्त क्रिकेटजगताच्या लक्ष लागून राहिले होते.

ऑस्ट्रेलियन संघाने 5 वेळा तर भारतीय संघाने 2 वेळा या आधी विश्व कप जेतेपद पटकावले होते,आज कोण यात भर पाडेल हे बघणे सर्वासाठी औत्सुक्याचे होते खरे पण सुरुवातीचा काही क्षणाचा खेळ सोडला तर ऑस्ट्रेलियन संघाने शानदार खेळ करत यजमान भारतीय संघाला त्यांच्याच घरात त्यांच्याच प्रेक्षकांसमोर दणदणीत पराभव करत सहाव्यादा विश्वकप जेतेपदावर आपली मोहोर उमटवली. आपल्या क्रिकेट करीयर मधली सर्वोत्तम खेळी करणाऱ्या हेडला सामन्याचा मानकरी म्हणून गौरविण्यात आले.

भारतीय संघाने आपले सर्वच्या सर्व म्हणजे 10 सामने जिंकून अंतिम फेरीत तर ऑस्ट्रेलियन संघाने सुरवातीचे काही सामने कभी हार कभी जीत करत योग्य वेळेत सूर शोधून आपल्या 10 मधले आठ सामने जिंकून आपल्या सहाव्या जेतेपदासाठी अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

ऑस्ट्रेलियन संघाने मागील काही काळात भलेही जागतिक क्रिकेटवर आपला दबदबा ठेवला असेलही,पण त्यांना या काळात सतत नडत राहीलेला एकमेव संघ म्हणजे भारतीय संघ.त्यामुळेच या अतिशय हाय व्होल्टेज पण तितक्याच महत्वाच्या सामन्याकडे जगभरातल्या क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून राहीले होते.

भारतीय डावाची सुरुवात नेहमीप्रमाणेच आजही खणखणीत अशीच झाली.रोहितने या संपूर्ण स्पर्धेत सुरवातीपासूनच आक्रमक अंदाजात फटकेबाजी करत विपक्षी संघावर दडपण आणणारी स्फोटक फलंदाजी केली आहे. आजही त्याने पहिल्याच षटकापासून आपले हात खोलले,तो रंगात आलाय असे वाटत असतानाच दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या युवा गीललाही आपणही आक्रमण करावे वाटले पण त्याचा हुकलेला फटका सरळ ऍडम जांपाच्या हातात जावून विसावला आणि भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला.

यावेळी भारतीय संघाची धावसंख्या 5 व्या षटकात 1 बाद 30 होती,यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात खेळायला आला तो विश्वकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा नवा विक्रमादित्य विराट कोहली. या जोडीने 92 सामन्यात 5200 हुन अधिक धावांची भागीदारी आतापर्यंत केली आहे ,ज्यात 17 अर्धशतकी तर 18 शतकी भागीदारी आहेत,आजही खरी गरज तीच होती,पण अर्धशतकी वा शतकी नव्हे तर एका मोठया भागीदारीची. गीलच्या विकेटच्या पतनाने रोहितची एकाग्रता जराही भंगली नाही असे वाटावे अशी फटकेबाजी तो आजही करत होता.

कमिन्सने त्याचा हा मूड ओळखून त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजी दिली अन पहिल्या दोन चेंडूवर 10 धावा काढल्यानंतरही तिसऱ्या चेंडूला आणखी एक उत्तुंग फटका मारण्याची घाई त्याला नडली, पण यावेळी मॅक्सवेलच्या झोळीत या विकेटचे श्रेय गेले ते हेडच्या अप्रतिम झेल.त्याने मागे पळत जावून घेतलेल्या झेलाने उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक स्तब्ध झाले. कदाचित या स्पर्धेतला हा सर्वोत्तम झेल असावा.रोहीत पुन्हा एकदा 47 धावा काढून तंबूत परतला,ज्या केवळ 31 चेंडूंत आल्या ज्यात 4 उत्तुंग षटकार आणि 3 चौकार सामील होते.

रोहित फारच सुंदर खेळत होता. अंतीम सामन्याचा कसलाही दबाव त्याच्यावर आहे असे वाटतच नव्हते. कधी नव्हे ते कांगारू दडपणाखाली आलेत असे वाटत होते, पण हेडने अप्रतिम झेल घेत सामन्याचा जणू रंगच बदलवून टाकला.भारतीय संघासाठी हा फार मोठा धक्का होता आणि या धक्क्याने सावरण्याआधीच या संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या श्रेयसला ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने आल्या पावली परत पाठवून मैदानात आणि भारतीय गोटात एकच खळबळ उडवून दिली.1 बाद 76 वरून भारतीय संघ 3 बाद 81 अशा बिकट अवस्थेत दिसू लागला.

 

यानंतर खेळायला आला तो के एल राहुल.त्याने आपली जबाबदारी ओळखून दुसऱ्या बाजूने शानदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला योग्य ती साथ द्यायला सुरुवात केली.हळूहळू हो हळूहळूच पण धीरोदात्तपणे ही जोडी धावा जमवायला लागली अन एकेक पण बहुमूल्य धाव भारतीय संघाच्या धावफलकावर वाढायला सुरुवात झाली. भलेही ही भागीदारी संथ होत होती पण ती फुलत होती हे जास्त आश्वासक होते अन महत्वाचेही होते.या जोडीने अर्धशतकी भागीदारी नोंदवून आपल्या असंख्य समर्थकांना बऱ्यापैकी आश्वासक केले.

दुसऱ्या बाजूने या संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळत असलेल्या विराटने “की रोल “निभावत आपले आणखीएक अर्धशतक नोंदवून मै हू ना असे सांगत आपले मिशन वर्ल्डकप सफल करणार असाच जणू संकेत दिला.महत्वाच्या सामन्यात अन ते ही दडपणाखाली विराट एक अविस्मरणीय खेळी खेळत होता. त्यामुळेच त्याच्या अर्धशतकानंतर थोड्याच वेळात पण तब्बल 96 चेंडू गेल्यानंतर अखेर पहिला चौकार मिळाला.

सगळे काही सुरळीत होत चालले आहे असे वाटत असतानाच पॅट कमिन्सच्या दुसऱ्या स्पेलमधल्या षटकात कोहलीच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टीवर आदळला आणि असंख्य भारतीय प्रेक्षकांच्या आशेचाही जणू अंत झाला. विराटच्या निग्रहाला जणू नियतीचीच नजर लागली.1 लाख 30 हजारांहून अधिक प्रेक्षक असलेल्या नरेंद्र मोदी मैदानावर सुनसान शांतता पसरली होती.त्याच्या जागी आलेल्या जडेजाने राहुलला साथ देत डाव सावरण्यासाठी भगीरथ प्रयत्न केले.

डावाच्या सुरवातीला रोहितच्या बॅटमधून निघणाऱ्या एक्सप्रेस धावा नंतर अतिशय दुर्मिळ झाल्या होत्या, पण तरीही सामंजस्य दाखवत या जोडीने धावा जमवायला सुरुवात केली. बघताबघता राहुलने यस्पर्धेतले आपले दुसरे अर्धशतक पूर्ण संघाला काही प्रमाणात का होईना पण दिलासा दिला.ही भागीदारी हळूहळू स्थिरावतेय असे वाटायला लागलेच होते की हेजलवूडने जडेजाला एका अप्रतिम चेंडूंवर फसवून भारतीय संघाला 5 वा धक्का दिला. यावेळी भारतीय संघ 36 व्या षटकात 5 बाद 178 अशा बिकट अवस्थेत दिसत होता, आता फक्त सुर्यकुमारच अखेरचा प्रमुख फलंदाज म्हणून बाकी होता.

 

त्याने के एल सोबत पुढे डाव सावरायला सुरवात केलीच होती की जम बसलेल्या राहुलची झुंजार खेळी स्टार्कने एका अप्रतिम इनस्विंगवर समाप्त करून भारतीय संघाच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. राहुलने या मैदानावर जबरदस्त खेळी करत महत्वपूर्ण अशा 66 धावा केल्या.खरे तर राहुलची ही खेळी नंतर कधी बघितले तर खूप संथ वाटेलही.107 चेंडूंत फक्त 1 चौकार मारत त्याने केलेल्या या धावा खूपच बहुमूल्य आहेत हे नक्की.

आता भारतीय संघा साठी एकच आशेचा “सूर्यकिरण ” होता तो म्हणजे मिस्टर 360 म्हणून नावारूपाला येत असलेला टी-20 स्पेशालिस्ट सुर्यकुमार यादव.पण त्यालाही आज 28 चेंडू खेळून केवळ 18 च धावा करता आल्या,तो 48 व्या षटकात बाद होवून तंबूत परततच भारतीय संघ सामन्यात चांगलाच खिंडीत सापडलाय हे स्पष्ट झाले.उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघांने जम बसलेल्या मिलरची विकेट मिळवून जसे आफ्रिकन संघाचे आव्हान अमाप केले तसेच आजही त्यांनी सुर्यकुमारला बाद करुन सामन्यावर मजबुत पकड प्राप्त केली आहे.जबरदस्त गोलंदाजी आणि त्याला क्षेत्ररक्षकांना दिलेली उत्तम साथ यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाने बलाढ्य भारतीय संघाला कमी धावसंख्येवर रोखण्यात यश मिळवले आहे.आतापर्यंत या स्पर्धेत चौकार षटकारांचा पाऊस पडणाऱ्या भारतीय संघाला या महत्वपूर्ण सामन्यात फक्त 13 चौकार आणि 4 च षटकार मारता आले यावरून ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या उत्तम गोलंदाजीचे मोल लक्षात येईल.

या धावसंख्येला आतापर्यंत या स्पर्धेत भल्याभल्या संघाला गारद करणारे भारतीय गोलंदाज कितपत पुरेसे ठरवतील याकडे सर्वांचे लक्ष्य लागुन राहिले होते.

या म्हटले तर मोठ्या म्हटले तर माफक लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.डावाच्या दुसऱ्याच षटकात शमीने वॉर्नरला बाद करून संघाला आश्वासक सुरवात करून दिली.त्यानंतर थोड्याच वेळात बूम बूम बुमराने मार्श आणि स्मिथ ला बाद करुन क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांना जल्लोष करण्याचा मोठा आनंद दिला,पण दुर्दैवाने त्यानंतर केवळ आणि केवळ त्यांना निराशच व्हावे लागले.

आक्रमक ट्रेविस हेडने टेरिफिक हेडएक होत आपल्या नैसर्गिक शैलीत शानदार फटकेबाजी करत सामन्याचा निकालच बदलवून टाकला. संपूर्ण विश्वकप स्पर्धेत भल्या भल्या संघाला मेटाकुटीला आणलेल्या भारतीय गोलंदाजांना पूर्णपणे नामशेष करत त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आणखी एक,(होय हाच आपल्या जागतिक टेस्ट विश्व कप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही असाच आडवा आला होता)अविस्मरणीय खेळी करत भारतीय संघाला भारतात पराभूत करण्यात सिंहाचा वाटा उचलत एकहाती संघाला विजय मिळवून दिला.

त्याने याआधी केलेल्या वा यानंतर करणाऱ्या असंख्य शतकांचा विसर पडावा असे एक यादगार शतक त्याने आजच्या सामन्यात करुन एकहाती भारतीय संघाला पराभूत केले.हेडला मारनस लाबुशेननेही उत्तम साथ देत चौथ्या गड्यासाठी 183 धावांची भागीदारी करून संघाला जगजेत्ते करून देण्यात मोठा वाटा उचलला. विजयाची औपचारिकता बाकी असताना तो सिराजला मेहरबान होवून तंबूत परतला पण तोवर त्याने करोडो भारतीय प्रेक्षकांना निराशेच्या खोल गर्तेत बुडवून टाकले.

या विश्वकप स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा फक्त एकच दिवस पण तो ही महत्वाच्या सामन्यात खरा निघावा यासारखा दुसरा दैवदुर्विल्सास तरी कुठला असावा?

पण चाहत्यांनी त्यांच्या आजच्या खेळाबद्दल निराश न होता त्यांनी आजपर्यंत या स्पर्धेत केलेल्या ददैदीप्यमान खेळाला स्मरूण आपल्या हिरोंना यापुढेही प्रोत्साहन देत रहावे इतकेच आज म्हणावे वाटते.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.