Break the chain : 18 वर्षाखालील मुलांना मॉलमध्ये प्रवेशास परवानगी, ओळखपत्र बंधनकारक

एमपीसी न्यूज – राज्यात 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने मुलांना मॉलमध्ये प्रवेशास बंदी घातली होती. मात्र, सुधारित आदेशानुसार 18 वर्षाखालील मुलांना मॉलमध्ये प्रवेशास परवानगी देण्यात आली असून, मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

 

कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने सोमवारी सुधारणा केली आहे. राज्यात 18 वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने 18 वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देताना वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असे सोमवारी  निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शॉपिंग मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.