Pune news: पुण्यातील व्यापारी ठेवणार आज सायंकाळी सातपर्यंत दुकाने खुली
पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने घंटानाद आंदोलन Agitation by Pune Chamber of Commerce.

राज्य शासनाने सोमवारी (दि. 2) दिलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या आदेशात पुण्यातील निर्बंध कायम ठेवले आहेत. पुणे जिल्ह्याला कुठलीही सूट देण्यात आली नाही.
वेळेच्या बंधनांविरोधात पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने आज शहरातील विविध ठिकाणी घंटानाद करीत आंदोलन करण्यात आले. शहरातील व्यापारी यावेळी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, फर्ग्युसन रस्ता, गणेश पेठ, बोहरी आळी, शिवाजी रस्ता, टिंबर मार्केट, कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता अशा सर्व प्रमुख रस्त्यांवर उतरत थाळी, घंटा वाजवीत व्यापाऱ्यांनी सरकारचा निषेध केला.
दुस-या लाटेचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने पुणे शहरात जीवनावश्यक वस्तूंखेरीज बाजारपेठेतील बाकी सर्व व्यवसायांवर वेळेची बंधने आणली आहेत. मात्र आता चार महिने उलटून गेले तरीही यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिथिलता आलेली नाही. एकीकडे शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना हे निर्बंध लादले जात असल्याने व्यापारी वर्गामध्ये प्रचंड असंतोष आहे, त्यामुळे सरकार विरोधात पुण्यातील व्यापा-यांनी रस्त्यावर उतरत घंटानाद आंदोलन केले.