Asia Cup 2023 : भारताने नेपाळवर अपेक्षित अन दमदार विजय मिळवत सुपर फोर मधे केला शानदार प्रवेश

नेपाळवर दहा गडी राखत केली दणदणीत मात

एमपीसीन्यूज : (विवेक कुलकर्णी) : आशिया कप 2023 (Asia Cup2023 ) स्पर्धेच्या भारतीय संघाच्या साखळी फेरीतल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नवख्या नेपाळ संघावर दणदणीत विजय प्राप्त करत सुपर फोर मधली आपली जागा अपेक्षितरित्या पक्की केली आहे. डकवर्थ लुईस नियमाच्या प्रणालीनुसार भारतीय संघाला 23 षटकात 145 धावा करण्याचे मिळालेले लक्ष भारतीय संघाने कर्णधार रोहित आणि शुभमन गील यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर सहज साध्य केले.

PCMC School : 16 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

आधी व्यक्त केली गेलेली पावसाची शक्यता,नंतर पावसाने सामन्यात आणलेला व्यत्यय याने भारतीय संघाच्या मनोनिग्रहात काहीही फरक पडला नाही. सामनावीर ठरलेल्या रोहीतच्या एकदिवशीय सामन्यातल्या 49 व्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोडीला शुभमन गीलच्या छोट्याशा कारकिर्दीतल्या सहाव्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दहा गडी आणि 17 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि सुपर फोर मधली आपली जागाही पक्की करत भारतीय समर्थकांना आनंदी केले.

पल्लीकल्लीच्या मैदानावर नवख्या नेपाळ विरुद्ध भारत या दोन देशातला आजचा सामना भारतीय संघाने मोठ्या दिमाखात जिंकला असला तरीही नेपाळ संघाने जोरदार लढत देत आपल्या दमदार खेळाची ताकत आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वानाच दाखवून क्रिकेटरसिकांच्या हृदयात नक्कीच जागा मिळवली आहे.
आज भारताचा कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पावसाच्या अवकृपेमुळे भारतीय गोलंदाजांना आपली ताकत दाखवण्याची हुकलेली संधी आज तरी साधावी हा हेतू त्या मागे होता.

मात्र याच गोष्टीचा नेपाळी संघाने अनपेक्षित पण जोरदार फायदा उठवत भारतीय संघाला चांगलेच परेशान केले,त्यातच भारतीय संघाचे क्षेत्ररक्षणही आज आपल्या दर्जाला साजेशे झाले नाही.भारताचे क्षेत्ररक्षण अतिशय खराब झाले, पहिल्या 5 षटकात भारतीय संघाने सोडलेल्या तीन झेलांमुळे नेपाळने पहिल्या दहा षटकात 65 धावा करत जखमेवर जणू मीठच चोळले.त्यांच्या संघाची सलामी जोडी चांगलीच तापदायक ठरतेय असे वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने कुशल भुर्तेलला बाद करून भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले.

कुशलने केवळ 25 चेंडूंत 3 चौकार आणि दोन षटकार मारत 38 धावा केल्या. त्याने असिफ शेखला उत्तम साथ देत पहिल्या गड्यासाठी 65 धावांची शानदार सलामी भागीदारी नोंदवली.या चांगल्या सुरुवातीनंतर अनुनभवी नेपाळ संघाची काहीअंशी घसरगुंडी उडाली,त्याला कारण ठरला रवींद्र जडेजा. त्याने आज अतिशय भेदक गोलंदाजी करत तीन गडी बाद केले,याचसोबत त्याने आजच्या सामन्यात मिळवलेल्या तिसऱ्या विकेट्स सह आशियाकप मध्ये इरफान पठाणच्या सर्वाधिक 22 बळीच्या विक्रमाची बरोबरी केली,गंमत म्हणजे या यादीत दुसऱ्या स्थानावर कोण आहे याची तुम्हाला कल्पना असेलच.

येस 17 विकेट्स घेऊन महान खेळाडू सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.एका बाजूने एकेक विकेट्स पडत होत्या, मात्र या परिस्थितीतही असिफ शेख जबरदस्त खेळत होता, त्याने कसलेही दडपण न घेता आपले 10 वे अर्धशतक पूर्ण करत नेपाळ संघातर्फे सर्वाधिक अर्धशतक करणारा फलंदाज म्हणून आपले नाव नेपाळच्या क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात गोंदवले.

अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर तो 58 धावांवर असताना सिराजच्या गोलंदाजीवर कोहलीच्या हातात झेल देवून बाद झाला,हा कोहलीचा 143 वा झेल ठरला,ज्यामुळे भारतीय संघातर्फे सर्वाधिक झेल घेणाऱ्या खेळाडूच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आला.यानंतरही नेपाळ संघाने कच न खाता केलेल्या शानदार फलंदाजीमुळे भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घामटा काढला.

सोमपाल कामीच्या 48 ,गुलशनच्या 23 आणि दीपेंद्रच्या 29 बहुमोल धावांच्या जोरावर नेपाळ संघाने भारताच्या मजबूत(?)गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत 230 धावा केल्या. भारतासाठी आनंद इतकाच होता की त्यांनी नेपाळ संघाला 48.2 षटकात सर्वबाद केले.जडेजा व सिराजने प्रत्येकी तीन गडी बाद केले,तर ठाकूर, शमी,पंड्या यांनी एकेक गडी बाद केला.

भारतीय संघाचा डाव सुरू होताच थोड्याच वेळात पावसाने जोर पकडला आणि भारतीय समर्थकांच्या मनाला एकच पण मोठा घोर लागला. पहिल्या सामन्याप्रमाणे हा सामना सुद्धा पावसामुळे रद्द होईल का?अर्थात तसे झालेच असते तरीही भारतीय संघ संकटात नक्कीच सापडला नसता.कारण दोन गुण मिळाले असते तरीही सुपर फोर मधला प्रवेश नक्की झाला असता, पण असे फुकाचे उपकार घेवून मिळालेला विजय फारसा आनंददायी रसिकांना तरी नक्कीच वाटला नसता.

अखेर पावसालाच दया आली आणि त्याने आपली कृपादृष्टी दाखवली. अर्थात त्यादरम्यान बराच वेळ गेल्याने षटकात कपात होणार होती ती झाली अन डकवर्थ लुईसच्या अजिबोगरिब समीकरणाच्या आधारावर भारतीय संघाला 23 षटकात 145 धावा करण्याचे सुधारित लक्ष्य मिळाले. याचा पाठलाग करताना शुभमन गील आणि रोहित शर्मा जोडीने पहिले काही षटके सोडल्यानंतर जबरदस्त फलंदाजी करत हे लक्ष अतिशय मामुली ठरवले आणि 21 व्या षटकातच संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

गील रोहित जोडीची दहा सामन्यातली आजची तिसरी शतकी भागीदारी ठरली जी विजयी लक्ष प्राप्त केल्यावरच तंबूत नाबाद परतली.रोहितने 59 चेंडूत 6 चौकार आणि 5 उत्तुंग षटकार मारत नाबाद 74 धावा केल्या तर गीलने 62 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 67 धावा केल्या. पुढील सामन्यासाठी आणि आगामी विश्वकप स्पर्धेसर्व भारतीय संघाची सलामी जोडी फॉर्मात येणे यासारखी शुभ बातमी दुसरी कुठलीही नसेल.

नेपाळ संघाचा प्रवास आज जरी इथेच संपला असला तरीही या (Asia Cup 2023) संघाने आजच्या जिगरबाज खेळाने त्यांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असल्याचे सिद्ध केले,पुढील काही वर्षांत नेपाळ संघ नक्कीच भल्याभल्या संघाला मात देऊ शकतो असे त्यांच्या संघाचा आजचा खेळ बघून नक्कीच मनाला वाटले. भारतीय समर्थकासाठी आजच्या विजयासोबतच येत्या 10 तारखेला पाकिस्तान सोबत पुन्हा एकदा भारतीय संघाची लढत होणार असल्याचे समजताच आनंदाची मोठीच लहर पसरली आहे.त्या सामन्याकडे जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक
नेपाळ 48.2 षटकात सर्वबाद 230
आसिफ शेख 58,कुशल 38,गुलशन 23,सोमनाथ 48,दीपेंद्रसिंग 29
जडेजा 40/3,सिराज 61/3,ठाकूर 26/1
पराभूत विरुद्ध
भारत 20.1 षटकात बिनबाद 146
रोहित नाबाद 74,गील नाबाद 67

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.