IND vs AUS : ऑस्ट्रेलियन संघाची सावध सुरुवात

एमपीसी न्यूज : दिल्ली येथील स्व. अरुण जेटली मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्याच्या मालिकेतल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली ज्यात पाहुण्या कांगारू संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा करुन बऱ्यापैकी चांगली सुरुवात केली आहे. (IND vs AUS) खेळपट्टीचे स्वरूप बघता ही धावसंख्या अगदीच मामुली ठरणार नाही हे बऱ्यापैकी जाणवत असल्याने पाहुणा संघ किमान आज तरी समाधानी असणार. या धावसंख्येला उत्तर देताना भारतीय संघांने नाबाद 20 धावा केल्या आहेत. कर्णधार रोहित 13 तर के एल राहुल 4 धावा करुन नाबाद आहेत. ऑस्ट्रेलिया संघ अजूनही 243 धावांनी आघाडीवर आहे.

आज सकाळी नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कंमिन्स याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि खेळपट्टीचे स्वरूप बघून संघात केवळ एकच वेगवान गोलंदाज ठेवण्याचा धाडसी निर्णय घेत संघात तीन फिरकी गोलंदाज घेतले. त्याने मॅथ्यू कुनेमन आणि ट्रेविस हेडला अंतिम संघात स्थान दिले तर भारतीय संघाने तंदुरुस्त झालेल्या श्रेयस अय्यरला संघात स्थान देताना सूर्यकुमार यादवला संघाबाहेर केले.ॉ

ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाची सुरुवात डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा यांनी केली. या जोडीने भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत पहिल्या गद्यासाठी अर्धशतकी भागीदारी जोडत संघाला मोठ्या धावसंख्येची आशा दाखवली. खतरनाक फलंदाज अशी ख्याती असलेला वॉर्नर मागील काही सामन्यात आपल्या लौकिकास जागु शकलेला नाही(अपवाद 100व्या कसोटीतल्या द्विशतकी खेळीचा)त्यामुळे त्याच्यावर (IND vs AUS) बऱ्यापैकी दडपण होतेच,आज त्याने खूप संथ पण सावध सुरुवात केली,आणि वाटायला लागले की तो आज आपल्या कीर्तीला जागणार, पण मोहम्मद शमीने त्याला एका अप्रतिम चेंडूवर चकवले आणि श्रीकर भरतने त्याचा उत्तम झेल घेत वॉर्नरची 15 धावांची छोटी खेळी समाप्त करत त्याला पुन्हा एकदा निराशेचे धनी केले.

वॉर्नर बाद झाला तेंव्हा ऑस्ट्रेलियन संघाची धावसंख्या 1 बाद 50 अशी समाधानकारक होती, त्याच्यानंतर आलेल्या मार्नस लाबूशेनने ख्वाजाला चांगली साथ देत डाव पुढे चालू ठेवला,ख्वाजा आज चांगल्या लयीत दिसत होता,त्यामुळेच या जोडीने बघताबघता दुसऱ्या गड्यासाठी आणखी 41 धावा जोडून डावाला आकार दिला आहे असे वाटत असतानाच रवीचंद्रन अश्विनने आपल्या एकाच षटकात लाबूशेन आणि स्टिव्ह स्मिथला बाद करुन भारतीय गोटात आनंदी वातावरण निर्माण करताना कांगारू ना 2 जोरदार हादरे दिले.आणि हे कमी की काय म्हणून शमीच्या गोलंदाजीवर के एल राहुलने हेडचा अप्रतिम झेल घेत पाहुण्या संघाची अवस्था 1 बाद 91 वरून चार बाद  108 अशी करुन टाकली.

यानंतर मात्र ख्वाजाने चांगली फलंदाजी करत आपले वैयक्तिक 19वे अर्धशतक पूर्ण  तर केलेच,पण त्याने हँडस्कोंबसोबत 59 धावांची बहुमूल्य भागीदारी करुन संघाला संकटातून बाहेरही काढले.ख्वाजा मोठमोठ्या खेळीसाठी प्रसिद्ध आहे,आजचा त्याचा खेळ बघता तो आपल्या संघासाठी त्या किर्तीला (IND vs AUS) जागणार असे वाटत असतानाच रवींद्र जडेजाने त्याची खेळी 81 धावावर समाप्त करून त्याला निराश केले.के एल राहुलने त्याचा अतिशय सुंदर झेल घेत त्याला शतकी खेळी करण्यापासून दूर ठेवले.हा जडेजाचा कसोटीमधला 250 वा बळी ठरला.

Shivsena : शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ ठेवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

जडेजाने आपले अष्टपैलूत्व सिद्ध करताना केवळ 62 व्या कसोटीतच 2500 हून अधिक धावा आणि 250 विकेट्स असा मैलाचा दगड गाठला.यातही कौतुकाची बाब म्हणजे अशी वेगवान कामगिरी करणारा तो जगातील दुसराच अष्टपैलू खेळाडू आहे, पहिला आहे अर्थातच महान अष्टपैलू इयान बोथम ज्याने अशी कामगिरी केवळ 55 कसोटीतच केली आहे.

हा विक्रम आजही अबाधित आहे.ख्वाजा बाद झाला तेंव्हा ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था 5 बाद 167 अशी बिकट झाली होती, त्यातच रवी अश्विनने अलेक्स कॅरीला आल्यापावली तंबूत परत पाठवून पाहुण्या संघाची अवस्था 6 बाद 168 अशी करून टाकली,यावेळी वाटत होते की भारतीय गोलंदाज पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाची नाकाबंदी करणार,मात्र कर्णधार पॅट  कंमिन्स आणि पीटर हँडस्कोंबने आक्रमक फलंदाजी करत संघाला बऱ्यापैकी आकार दिला.

या जोडीने सातव्या गड्यासाठी 59 धावांची वेगवान भागीदारी करत संघाला  दोनशेचा टप्पाही गाठून दिला.कमिन्स तर अतिशय जोशात खेळत होता.त्याने 3 चौकार व 2 षटकार मारत 33 धावा चोपल्या.ही जोडी खतरनाक ठरतेय असे वाटत असतानाच जडेजाने पुन्हा एकदा आपली कमाल दाखवत (IND vs AUS) कमिन्स आणि मर्फीला एकाच षटकात बाद करुन ऑस्ट्रेलियन संघाला मोठी धावसंख्या करता  येणार नाही अशीच खबरदारी घेतली. तरीही पीटर हँडस्कोंबने एकाकी लढत देत संघाला 263 धावांची बऱ्यापैकी चांगली धावसंख्या गाठून दिली. त्याने नाबाद 72 धावा करुन संघाला संकटातून बाहेर काढण्यात मोठी कामगिरी उचलली.

मोहम्मद शमीने सुरुवातीची आणि शेवटची विकेट मिळवत एकूण चार तर अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी तीन तीन गडी बाद करत चांगली साथ दिली. मात्र 168 वर सहा अशी खराब स्थिती असतानाही यजमान संघाचे गोलंदाज ऑस्ट्रेलियन डावाचे शेपूट गुंडाळू न शकल्याने ऑस्ट्रेलियन संघाला 263 धावांची चांगली मजल मारण्यात यश आले.
उत्तरादाखल खेळताना रोहित आणि राहुलने सावधगिरी बाळगत आपापल्या विकेट्स शाबूत ठेवल्या आणि आजच्या दिवसांचा खेळ संपला तेंव्हा आपल्या नावावर नाबाद 20 धावा नोंदवल्या आहेत. पाहुण्या संघाकडे अजूनही 243 धावांची आघाडी आघाडी शिल्लक आहे. अर्थात सामन्याचा आजचा पहिलाच दिवस असल्याने अभी तो बहोत कुछ बाकी है असे म्हणता येईल.तरीही भारतीय मजबूत फलंदाजी बघता भारतीय संघ पहिल्या डावात मोठ्या आघाडीसाठीच प्रयत्न करणार हे निश्चित.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया
पहिला डाव सर्वबाद 263
ख्वाजा 81,हँडस्कोंब नाबाद 72,कमिन्स 33
शमी 60/4,अश्विन 57/3,जडेजा 68/3
भारत पहिला डाव
नाबाद 20
रोहित नाबाद 13,राहुल नाबाद 4

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.