Pimpri : ‘वायसीएमएच्‌’मधील अनियमितता; उपलेखापालासह तीन कारकूनांची वेतनवाढ स्थगित 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच्) रुग्णालयातील आर्थिक अनियमिततेस जबाबदार असणा-या उपलेखापाल, मुख्य कारकून, दोन कारकून अशा चार जणांची वेतनवाढ स्थगित करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला. 

उपलेखापाल बबलू भिमराव तेलंगी, मुख्य कारकून काळुराम पांडुरंग बवले, कारकून सुरज विश्वनाथ पाटकर आणि इस्माईल अहमदमियॉ शेख, अशी वेतनवाढ स्थगित केलेल्यांची नावे आहेत.

वायसीएमएच् रुग्णालयात आर्थिक अनियमितता झाली होती. कारकून बाळू मारुती भांगे यांनी अनियमितता केल्याचे निर्दशनास आले होते. त्यांच्या चौकशीत अनियमितता केल्याचे भांगे यांनी मान्य करत अपहार केल्याची तीन लाख 60 हजार 801 रुपये एवढी रक्कम भांगे यांच्याकडून पालिकेच्या कोशागारात भरणा करण्यात आली आहे.

उपलेखापाल बबलू तेलंगी, मुख्य कारकून काळुराम बवले, कारकून सुरज पाटकर आणि इस्माईल शेख यांनी स्वत:चे लॉगीन आयडी, पासवर्डबाबत पुरेशी दक्षता घेतली नाही. त्यामुळे भांगे यांनी शासकीय पैशांचा अपहार केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला होता. तेलंगी यांनी कामकाजावर दुर्लक्ष व आर्थिक बाबीवर नियंत्रणामध्ये कुचराई केल्याचे सिद्ध झाले.

तेलंगी, बवले, पाटकर, शेख यांच्यावर ठेवण्यात आलेले दोषारोप सिद्ध झाले आहेत. कामातील निष्काळजीपणामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या चार जणांची प्रत्येकी एक वेतनवाढ स्थगित केली आहे. तसेच यापुढे त्यांनी कोणत्याही स्वरुपाच्या कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे.

दरम्यान, पालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या वायसीएमएच् रुग्णालयातील शल्यचिकित्सक डॉ. संजय विजयराव पाडळे हे बिबेवाडी येथे खासगी दवाखाना चालवित आहेत. तसेच पालिकेकडून व्यवयायरोध भत्ता (NPA) देखील घेत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

त्यामुळे त्यांच्या दोन वेतनवाढ स्थगित करण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला असून त्यांच्याकडून आठ लाख 24 हजार 297 रुपये व्यवयायरोध भत्ता वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. यापुढे कोणत्याही स्वरुपाचे कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर जबर शास्तीची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच याची नोंद पाडळे यांच्या सेवा पुस्तकात करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.